MPC News Special : कुंडमळ्यातील बंधारा अपघातांचा ‘ब्लॅक स्पॉट’

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील शेलारवाडी जवळ कुंडमळ्यात असलेल्या  बंधाऱ्यावरून जाणाऱ्या वाहनांचे सातत्याने अपघात होत आहेत. 10-12 किलोमीटर अंतराचा वळसा न घालण्यासाठी वाहन चालक या अरुंद बंधाऱ्यावरून वाहने चालवतात आणि नियंत्रण सुटल्याने अथवा निसरड्या भिंतीवरून घसरून वाहने थेट पाण्यात पडतात. यामुळे हा बंधारा अपघातांचा ‘ब्लॅक स्पॉट’ बनला आहे.

Dighi : महिलेची फसवणूक करत सोने व रोख रक्कम केली लंपास

वाहतुकीसाठी पूल बांधण्याचे काम कागदावरच

कुंडमळा ते शेलारवाडी दरम्यान इंद्रायणी नदीवर पूल बांधण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून वारंवार केली जात आहे. (MPC News Special) या मागणीवरून माजी मंत्री बाळा भेगडे आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्थळ पाहणी देखील केली. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून या पुलाचे काम करण्यात येणार असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले. मात्र तो पूल अजूनही कागदावरच राहिलेला आहे.

वारंवार होणारे अपघात

सोमवारी (दि. 5) सकाळी या बंधाऱ्यात एक छोटा हत्ती टेम्पो घसरून पडला. चालक वेळीच बाहेर पडल्याने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. 26 मे रोजी एक कार बंधाऱ्यात पडली. याबरोबरच ट्रॅक्टर, जीप, बैलगाडी आणि कारचे इथे वारंवार अपघात झाले आहेत. बाणेर येथील एक महिला कारमधून या बंधाऱ्यावरून जात असताना तिची कार पाण्यात पडली. त्यात ती महिला ठार झाली होती. बैलगाडी पाण्यात पडल्याने पशुधन आणि शेतमालाचे देखील नुकसान होत आहे.

जवळचा मार्ग म्हणून होतोय वापर

शेलारवाडी, कान्हेवाडी तर्फे चाकण या गावातील नागरिकांना तळेगाव, घोरावाडी रेल्वे स्टेशन जवळ आहे. पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहराकडे जाण्यासाठी इंद्रायणी नदीवरील मार्ग नागरिकांना जवळचा वाटतो. दुसऱ्या मार्गाने जायचे झाल्यास तब्बल 10 ते 12 किलोमीटरचा वळसा घालावा लागतो. हा वळसा वाचविण्यासाठी दुरावस्था झालेल्या बंधाऱ्याच्या कठड्यावरून वाहने नेली जातात. नागरिक जीवाचा धोका पत्करून या मार्गाने प्रवास करीत आहेत.

लहान पूल पण तोही पावसाळ्यात होतो बंद

कुंडमळा येथील बंधाऱ्यावरून बारमाही पाणी वाहते. त्यामुळे या बंधाऱ्यावरून येजा करणे कायम धोक्याचे असते. दरम्यान, दिवंगत माजी आमदार दिगंबर भेगडे यांच्या काळात इंद्रायणी नदीवर एक लहान पूल बांधण्यात आला आहे. यावरून पादचारी नागरिक आणि दुचाकीस्वार येजा करतात. पावसाळ्यात नदीला पाणी आल्यानंतर या पुलावरून देखील वाहतूक करता येत नाही. गावातील अनेक शेतकऱ्यांचे शेत नदीच्या दुसऱ्या दिशेला आहे. (MPC News Special)  त्यामुळे नदीला पाणी आल्यास या शेतकऱ्यांची देखील मोठी गैरसोय होते.

हे करायला हवे
बंधाऱ्यावरील वाहतूक बंद करावी
नदीवर नवीन रुंद, उंच पूल बांधावा
बंधाऱ्याची उंची वाढवून पाण्यासाठी दरवाजे केल्यास एकेरी वाहतूक होऊ शकेल
पुलाचे काम होईपर्यंत नागरिकांनी इतर मार्गाने वाहतूक करावी

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.