City Cup 2021 : ब्ल्युस्टॅगचा रुपाली एससीला धक्का

एमपीसी न्यूज – पिछाडी भरून काढत ब्ल्यूस्टॅगने अव्वल गटातील रुपाली एस सी संघाचा 5-1 असा पराभव करून पहिल्या सिटी करंडक 2021 बाद फेरी स्पर्धेत आपली आगेकूच कायम राखली. ही स्पर्धा पुण्यातील मोशी येथील सिटी स्पोर्टस अरेना येथे सुरू आहे. पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेच्या (पीडीएफए) सहाय्याने या स्पर्धेचे आयोजन सिटी एफसी, पुणे संघाने केले आहे.

रुपाली एससी संघाने 7व्या मिनिटालाच आघाडी घेतली. त्यांच्या शुभम पोटघन याने हा गोल केला. त्यानंतर ब्ल्यूस्टॅग एसए संघाने 20व्या मिनिटाला बरोबरी साधली. त्या वेळी प्रशांत थोरातने 27व्या मिनिटाला जाळीचा अचूक वेध घेतला. बरोबरीनंतर ब्ल्यूस्टॅगचा खेळ अधिक आक्रमक झाला. त्यांनी 30व्या मिनिटाला गोल करून 2-1 अशी आघाडी घेतली.

मध्यंतराला त्यांनी 2-1 अशी आघाडी राखली होती. उत्तरार्धात त्यांच्या आक्रमणाची धार अधिक वाढली. सामन्याच्या 45व्या मिनिटाला तन्मय बर्वे, 51व्या मिनिटाला अनिकेत गेन, 58व्या मिनिटाला विजय सायालु यांनी गोल करून धक्कादायक निकालाची नोंद केली.

दुसऱ्या सामन्यात आयफा (एआयवायएफए) संघाने एबीसी एफसी संघावर 6-0 असा दणदणीत विजय मिळविला. हृतिक पाटिल याने 24 आणि 28 व्या मिनिटाला दोन गोल केले. हिमांशु चव्हाण (13वे), राज मोरे (18वे), घनश्याम पी (28वे), सॅम्युएल सेल्वादास (50वे) यांनी गोल करून संघाचा मोठा विजय साकार करण्यात आपला वाटा उचलला.

निकाल –

  • ब्ल्यूस्टॅग एस.ए. 5 (प्रशांत थोरकात 27वे, सिचन चांडेल 30वे, तन्मय बर्वे 45वे, अनिकेत गेन 51वे, विजय सायालू 58वे मिनिट) वि.वि. रुपाली एससी 1 (शुभम पोटघन 7वे मिनिट)
  • आयफा (एआयवायएफए) 6 (हिमांशु चव्हाण 13वे, राज मोरे 18वे,. हृतिक पाटिल 24, 48वे, घनश्याम पटेल 28 वे, सॅम्युएल सेल्वादास 50वे मिनिट) वि.वि. एबीसी एफ सी 0

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.