Pune : सुतारवाडी पाषाण येथील तलावाचे प्रवेशद्वार तोडून छटपूजेचा कार्यक्रम ; अटकाव न करणाऱ्या महापालिका अधिकारी, कर्मचा-यांवर कारवाई करा – किशोर शिंदे

एमपीसी न्यूज – सुतारवाडी पाषाण येथील तलावाचे प्रवेशद्वार तोडून, पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवर दादागिरी करून दिनांक 3 नोव्हेंबर रोजी पहाटे 3 वाजता 500 ते 600 लोकांनी छटपूजेचा कार्यक्रम केला. यावेळी मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई व साउंड सिस्टीम लावण्यात आली होती. त्यामुळे या तलावाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण झाले. पक्षीप्रेमींमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. या कार्यक्रमास पुणे महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोणत्याही अटकाव केला नाही. त्यामुळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी मनसेचे सरचिटणीस ऍड. किशोर शिंदे यांनी आज केली.

या संदर्भातील निवेदन अतिरिक्त आयुक्त रुबेल अग्रवाल यांना देण्यात आले. पुणे मनपा प्रशासनाकडून ज्यांनी प्रशासनावर दादागिरी केली. त्यांच्यावरही कारवाई करून गुन्हा नोंदविण्यात यावा, असेही निवेदनात म्हटले आहे.

या छटपूजेच्या कार्यक्रमाला कोणतीही परवानगी नसताना पोलिसांनीही बघ्यांचीच भूमिका घेऊन कोणतीही कारवाई केली नाही. मनसेचा कोणत्याही धार्मिक कार्यक्रमास विरोध नाही. परंतु, ज्या ठिकाणी पर्यावरणाचे रक्षण करायचे अशा सेन्सेटिव्ह झोनमध्ये कार्यक्रम आयोजित करणे हे गैरकृत्य असल्याचेही किशोर शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. शहर सचिव नरेंद्र तांबोळी, मनविसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत कानोजिया उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.