Jalna News : देव तारी त्याला कोण मारी! जालन्यात बस नदीत कोसळून अपघात, 23 प्रवासी सुखरूप

एमपीसी न्यूज –  पुलावरील पाण्याचा अंदाज न आल्याने २३ प्रवाशांनी भरलेली बस थेट नदीत कोसळल्याची घटना गुरूवारी रात्री (दि.२३) जालना जिल्ह्यात घडली. काळजाचा ठोका चुकवणाऱ्या या घटनेत केवळ ग्रामस्थ आणि प्रशासनाची सतर्कता कामी आली असून सगळ्याच प्रवाशांना सुखरूप पाण्याबाहेर काढण्यात यश आले आहे. ही घटना जालन्यातील परतूर आष्टी येथील श्रीष्ठी परिसरात घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, २३ प्रवाशांनी भरलेली बस रात्रीच्या वेळेस श्रीष्ठी परिसरातील कसुरा नदीपुलावरून जात होती. दरम्यान, मुसळधार पावसामुळे पुलावर पाणी साचले होते. रात्रीच्या अंधारात पुलावरील पाण्याचा चालकास अंदाज न आल्याने बस थेट नदीत कोसळली. मात्र प्रशासन आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली आणि सगळ्याच प्रवाशांचे प्राण वाचवण्यात यश आले.

नदी पात्रात बस कोसळल्याचे कळताच तातडीनं पोलिस आणि ग्रामस्थ दुर्घटनास्थळी दाखल झाले आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून सर्व प्रवाशांना बसमधून बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू झाले. रात्रीच्या अंधारामुळे काहीसा अडथळा येत होता मात्र त्यावर मात करत मोठ्या हिमतीने दुर्घटनाग्रस्तांचा जीव वाचवण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.