IPL 2021 : कोलकाता नाईट रायडर्सने मुंबईला दणदणीत हरवत गाठले चौथे स्थान

एमपीसी न्यूज पिंपरी (विवेक कुलकर्णी) – मुंबई इंडियन्सने धडाकेबाज सुरुवात करुनही न डगमगता त्यांना उत्तम गोलंदाजीच्या जोरावर 155 धावांवर रोखल्यानंतर नवोदित वेंकटेश अय्यर आणि अनुभवी राहूल त्रिपाठीच्या जबरदस्त आक्रमक फलंदाजीच्या जोरावर केकेआर ने मुंबई इंडियन्सवर मोठा विजय मिळवत या विजयासह अंकतालिकेत चौथा क्रमांक मिळवून मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्सला मागे टाकले आहे.

पहिल्या चार जणांत जो जिंकेल तो जाईल अशी परिस्थिती आजचा सामना सुरू होण्याआधी असल्याने दोन्हीही संघ यासाठी जिवाचे रान करतील यात कोणालाही कसलीही शंका नव्हतीच,एक उत्कंठावर्धक सामना बघायला मिळणार अशी अपेक्षा क्रिकेट रसिक बाळगून होतेच. आयपीएल मधली सर्वांत यशस्वी टीम पण बेभरवशाची खेळ असा काहीसा विचित्र नावलौकिक असलेली मुंबई इंडियन्स आजही आपल्या या नावलौकिकाला जागणारा खेळ खेळली.

आयपीएल 2021 च्या आजच्या 34व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्विकारली पण मॉर्गनचा हा निर्णय चुकीचा वाटावा अशी फलंदाजी रोहीत शर्मा आणि डिकॉकने सुरू केली. दुखापतीनंतर पुनरागमन करणारा रोहित आज नेहमीच्या लयीत असल्याचे जाणवत होते आणि त्याच्याहुनही सुंदर आणि आकर्षक खेळत होता तो डीकॉक. यामुळे मुंबई इंडियन्सला उत्तम सलामी मिळाली.

रोहितची लय बघता आज तो मोठी खेळी खेळेल असे वाटत असतानाच तो 30 चेंडूत 33 धावा काढून सुनील नारायणच्या गोलंदाजीवर शुभमन गीलकडे झेल देऊन बाद झाला,पण त्याआधी त्याने सलामीला 9 षटकात 78 धावा जोडल्या होत्या. त्यानंतर आलेला सुर्यकुमार आजही विशेष काही करू शकला नाही आणि तो केवळ 5 धावा तेही दहा चेंडू खर्च करून प्रसिद्ध कृष्णाचा बळी ठरला.

या दोन बळींमुळे मुंबई इंडियन्स एक्सप्रेसच्या जलदगतीला चांगलीच खीळ बसली आणि कोलकाता संघाची गोलंदाजी सुध्दा एकदम जोरदार व्हायला लागली ज्याने जम बसलेल्या डीकॉकला सुद्धा जखडून ठेवले गेले तर मग आल्या आल्या ईशान किशन तरी काय करू शकणार होता? याच दडपणातुन डिकॉक धावसंख्या वाढवण्याच्या नादात प्रसिद्ध कृष्णाचा बळी ठरला पण त्याआधी त्याने 42 चेंडुत चार चौकार आणि तीन षटकार मारत 55 धावा केल्या होत्या.

दरम्यान, याच दडपणाखाली ईशान किशन सुद्धा केवळ 14 धावा करून फर्ग्युसनच्या गोलंदाजीवर बाद झाला बिनबाद 77 वरून 5 बाद 119 अशी कठीण अवस्था झाल्यानंतर 20/20चा बादशहा पोलार्ड आला खरा पण आज त्यालाही विशेष काही करता आले नाही. रोहितची विकेट मिळवल्यानंतर कोलकाता संघाची गोलंदाजी 12 ते 17षटकादरम्यान फारच किफायतशीर ठरली ज्यामुळे मुंबई इंडियन्स आपल्या निर्धारित 20 षटकात केवळ 155 धावांच करू शकली.

20 व्या षटकात लोकी फर्ग्युसनने सुंदर गोलंदाजी करताना कृनाल पंड्याला बाद केले तर पोलार्ड सुद्धा याच षटकात धावबाद झाला, सौरभ तिवारी मुळे मुंबई इंडियन्सने 150 धावांचा टप्पा ओलांडला आणि कोलकाता संघापुढे 156 धावांचे लक्षही ठेवता आले. 157 धावांचे लक्ष डोळ्यापुढे ठेवून खेळताना नवोदित वेंकटेश अय्यर जो व्यवसायाने सनदी लेखापाल म्हणजेच मराठीत CA आहे त्याने आणि शुभमन गीलने अतिशय आक्रमक सुरुवात करत मुंबईच्या गोलंदाजांवर सुरुवातीपासूनक दडपून ठेवले.

पहिल्याच षटकात 14 धावा ठोकताना गील व अय्यरने अतिशय देखणे षटकार मारत पुढे काय वाढून ठेवले आहे याचीच झलक दाखवली, शुभमन गील जरी लवकर बाद झाला तरी अय्यरचा मूड आज कुछ तुफानी करते है असाच होता, त्याने आज बोल्ट, बुमराह अशा आंतरराष्ट्रीय अनुभवी गोलंदाजावर हल्ला चढवत मुझमे है दम याचीच प्रचिती दिली, त्याला साथ द्यायला आलेल्या राहुल त्रिपाठीने आपली जबाबदारी अतिशय चोख पार पाडत संघाला बघताबघता विजयासमीप आणून सोडले.

अय्यरने आपले पहिलेच अर्धशतक पूर्ण करताना आक्रमक आणि आकर्षक खेळ केला, त्याने केवळ 30 चेंडूतच 53 धावा करताना चार चौकार आणि तीन षटकार मारले. 12 व्या षटकात तो वैयक्तिक 53 धावांवर बुमराहच्या गोलंदाजीवर बाद झाला खरा पण तोपर्यंत विजय केकेआरच्या झोळीत आलाच होता,कर्णधार मॉर्गनला घाई नडली आणि तो सात धावा काढून बाद झाला,पण विजयाची औपचारिकता नितीश राणा आणि आजचा दुसरा जबरदस्त खेळ करणाऱ्या राहुल त्रिपाठीने पूर्ण केली.राहुलने केवळ 42 चेंडूवर नाबाद 74 धावा ठोकताना 8 चौकार आणि तीन षटकार मारले.

मुंबई इंडियन्सकडून केवळ बुमराहच विकेट्स मिळवू शकला. मुंबईच्या सलामी जोडीने जोरदार सुरुवात केल्यानंतरही आपल्या रणनीतीवर ठाम राहत सर्वांगसुंदर खेळ करणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सवर नुसताच विजय मिळवला नाही, तर त्यांनी या विजयाबरोबरच या स्पर्धेतल्या पहिल्या चार सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या संघातही आपला चौथा क्रमांक लावला आहे. दुसरीकडे मुंबई इंडियन्सने मात्र उत्तम सुरुवात करूनही नंतर खराब खेळ करून आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे की नाही हे पुढील काही सामन्यानंतर कळेलच.

रोहित शर्माची किंमती विकेट मिळवून आपल्या संघाला विजयापथ दाखवणारा सुनील नारायण या सामन्यातला मात्र सामनावीर ठरला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.