Chinchwad : शासनाच्या निर्देशानुसारच गणेशोत्सव साजरा करा; पोलीस आयुक्तांचे शहरातील गणेश मंडळांना आवाहन

Celebrate Ganeshotsav as directed by the government; Commissioner of Police appeals to Ganesh Mandals in the city.

महापालिका प्रशासन, पोलीस आणि गणेश मंडळांची बैठक संपन्न

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करूनच यावर्षीचा गणेशोत्सव साजरा करा, असे आवाहन पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी केले आहे.

महापालिका प्रशासन, पोलीस आणि गणेश मंडळांची सोमवारी (दि. 17) बैठक घेण्यात आली. या बैठकीत पोलीस आयुक्तांनी हे आवाहन केले. बैठकीसाठी आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त स्मिता पाटील, विनायक ढाकणे, महापौर उषा ढोरे, पिंपरी चिंचवड महापालिकेचे अपर आयुक्त संतोष पाटील, अजीत पवार व आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाण्यांचे वरीष्ठ पोलीस निरिक्षक व मंडळांचे पदाधिकारी, शांतता कमिटी सदस्य हजर होते.

22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव साजरा होणार आहे. पुणे शहरातील कोरोना संसर्गाचे वाढते प्रमाण लक्षात घेता काही कठोर निर्णय घेणे भाग आहेत.

त्यानुसार मागील सहा महिन्यात धार्मिक, सामाजिक व उद्योग व्यवहारात अनेक बंधने अंमलात आणली गेली आहेत. परंपरांना मुरड घालत वर्षानुवर्षे साजरे होणारे उत्सव आरोग्य विभागाने दिलेल्या निर्देशांप्रमाणे साजरे करीत असताना प्रत्येकाची भावना जपण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

पोलीस आयुक्त आणि महापौर यांनी कोरोना साथीच्या अनुषंगाने शासनाने जे निर्देश दिले आहेत, त्यांचे प्रत्येकाने पालन करावे. यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्ध्तीने साजरा करावा.

धार्मिक पूजापाठ करताना योग्य खबरदारी घ्यावी. सामाजिक अंतर राखणे, निर्जंतुकीकरण करणे यांसारख्या बाबींची दक्षता घेणे आवश्यक आहे. मंडप, मिरवणुका याबाबत प्रशासनाने गणेश मंडळांना सूचना दिल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.