Central Railway : राज्यात मुंबईसह आणखी चार मार्गांवर धावणार विशेष रेल्वे

एमपीसी न्यूज – मध्य रेल्वे विभागाने उद्यापासून (दि. 9 ऑक्टो.) राज्यात 5 विशेष रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मुंबई, पुणे, नागपूर, गोंदिया व सोलापूर या मार्गांचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ट्विटरवरून दिली.  

तसेच ही विशेष रेल्वेसेवा जरी पूर्ण क्षमतेने चालू करण्यात आली असली तरी फक्त आरक्षण करणाऱ्या प्रवाशांनाच यातून प्रवास करता येणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.

यामध्ये मुंबई – नागपूर दुरंतो एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन (पुणे – मुंबई, मुंबई – पुणे), सिद्धेश्वर एक्स्प्रेस (मुंबई – सोलापूर), मुंबई-गोंदिया या गाड्या चालू करण्यात येत आहेत. या गाड्यांचे आरक्षण सुरू करण्यात आले असून या सर्व गाड्यांच्या वेळा व क्रमांक पूर्वीप्रमाणेच ठेवण्यात आले आहेत.

पुढीलप्रमाणे असेल गाड्यांचे नियोजन

मुंबई – नागपूर दुरांतो विशेष ही गाडी 10 ऑक्टोबरपासून दररोज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटेल. तर दुरांतो विशेष ट्रेन 9 ऑक्टोबरपासून नागपूर येथून सुटणार आहे. दोन्ही गाड्या इगतपुरी स्थानक वगळता नियमित स्थानकांवर थांबेल.

मुंबई-पुणे सुपरफास्ट विशेष 9 ऑक्टोबरपासून तर पुण्यावरून सुपरफास्ट विशेष गाडी 10 ऑक्टोबरपासून दररोज सुटेल.

मुंबई-गोंदिया सुपरफास्ट विशेष गाडी 9 ऑक्टोबरपासून दररोज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटेल. गोंदियावरून सुपरफास्ट विशेष गाडी 10 ऑक्टोबरपासून दररोज सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी पोहोचेल. नियमित वेळेत इगतपुरी स्थानक वगळता गाडीच्या नियमित स्थानकांवर थांबेल.

मुंबई-सोलापूर सुपरफास्ट विशेष गाडी 9 ऑक्टोबरपासून दररोज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सोलापूरला पोहोचेल. सोलापूरवरून सुपरफास्ट विशेष गाडी 9 ऑक्टोबरपासून दररोज सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी पोहोचेल. तर, कर्जत, खंडाळा, लोणावळा, माढा, मोहोळ आणि भिगवण ही स्थानके वगळता इतर स्थानकांवर थांबेल.

तसेच प्रवाशांनी प्रवास करताना सर्व आरोग्यविषयक दक्षता घेत सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक आहे, असेही विभागाने स्पष्ट केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.