Chakan : संग्रामदुर्ग किल्ल्याला मिळणार गतवैभव !

दोनशे वर्षापूर्वीच्या जुन्या नकाशांचा आधार; मूळ स्वरुपातील किल्ला समोर येणार

एमपीसी न्यूज- चाकणच्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याचे जुने नकाशे उपलब्ध झाले आहेत. नकाशाच्या आधारे मूळ स्वरुपात किल्ला अस्तित्वात आणण्यासाठी उत्खनन करण्याचे पुरातत्व विभागाचे प्रयत्न आहेत. उपलब्ध झालेल्या त्या पुरातन नकाशाच्या आधारे किल्ल्याचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी किल्ल्याचा सविस्तर आराखडा तयार करण्यात यावा, या मागणीसाठी आमदार सुरेश गोरे यांनी किल्लेदार फिरंगोजी नरसाळा स्मारक प्रतिष्ठानच्या पदाधिकार्यांसोबत राज्य पुरातत्व विभागाचे सहायक संचालक विलास वहाणे यांची भेट घेतली.

चाकणचा भुईकोट किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांचे सेनापती किल्लेदार फिरंगोजी नरसाळा व मुगल सेनापती शाहिस्तेखान यांच्यामधे झालेल्या संघर्षामुळे इतिहासात प्रसिद्ध आहे. चाकणच्या संग्रामदुर्ग किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व असून जून 1660 मध्ये शाहिस्तेखानाची स्वराज्यावर स्वारी झाली, त्यावेळी त्याची गाठ या किल्ल्याशीच प्रथम पडली होती. त्यावेळी किल्लेदार फिरंगोजी नरसाळा यांनी तीनशे – साडेतीनशे मावळ्यांसह हा किल्ला तब्बल 56 दिवस लढवत मोगलांच्या विशाल फौजेला जेरीस आणल्याने स्वराज्याच्या साहस पर्वाच्या इतिहासात संग्रामदुर्गाची वेगळी ओळख आहे.

चाकणच्या संग्रामदुर्ग किल्ल्याचा समावेश राज्य शासनाने 22 जून 2016 रोजी संरक्षित किल्ल्यांत केलेला आहे. राज्य पुरातत्व विभाग, पुणे आणि किल्लेदार फिरंगोजी नरसाळा स्मारक प्रतिष्ठान यांच्या अथक प्रयत्नाने किल्ल्याचे जुन्या काळातील पुरातन वास्तू नकाशे, मोजमाप नकाशे तसेच किल्ल्याचा आराखडा उपलब्ध झालेला आहे. संबंधित नकाशे सुमारे दोनशेवर्षे जुने असल्याचे सांगण्यात येत आहे. उपलब्ध झालेल्या या माहितीच्या आधारे किल्ल्याचे जतन व संवर्धन करण्याची मागणी आमदार सुरेश गोरे यांनी केली आहे . त्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य आणि निधीची उपलब्धतता करण्याचे आश्वासन यावेळी आमदार सुरेश गोरे यांनी दिले.

किल्ल्याचा आराखडा तयार करण्यासाठी किल्ल्यामधे नकाशाच्या आधारे उत्खनन करणे गरजेचे असून त्यासाठी तत्काळ निधीची आवश्यकता असल्याचे पुरातत्व विभागाने स्पष्ट केल्यानंतर खेडचे आमदार सुरेश गोरे यांनी आमदार स्थानिक विकास निधीमधून 10 लाख रुपये मंजूर करून उत्खननाचे काम लगेच सुरु करावे अशी मागणी पुरातत्व विभागाकडे केली आहे. यावेळी किल्लेदार फिरंगोजी नरसाळा स्मारक प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण झिंजुरके, उपाध्यक्ष राहुल वाडेकर, सचिव अनंत देशमुख तसेच संचालक योगेश साखरे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.