Chakan : गणेश मूर्ती विसर्जन मिरवणुकीत खेडचे आमदार सुरेश गोरे यांनी धरला ढोल-लेझीमवर ठेका

एमपीसी न्यूज – चाकण (ता. खेड) येथील सर्वच सार्वजनिक मंडळातील कार्यकर्त्यांचा उत्साह विसर्जन मिरवणुकीत गुरुवारी (दि.१२) पाहायला मिळाला. कार्यकर्त्याचा उत्साह पाहून गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीचे स्वागत करण्यासाठी उपस्थित असलेल्या राजकीय नेत्यांनाही मिरवणुकीत सहभागी होण्याचा मोह झाला. त्यातून चाकणमध्ये महात्मा फुले चौकात चक्क खेडच्या आमदारांनी ढोलाच्या तालावर ठेका धरल्याचे चित्र चाकणकरांना पाहायला मिळाले.

चाकणमध्ये मोठ्या सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्ती विसर्जन मिरवणुका सायंकाळी सहानंतर सुरु झाल्या. रात्री उशिरापर्यंत या विसर्जन मिरवणुका सुरूच होत्या. चाकणमधील महात्मा फुले चौकात सर्वच गणेश मंडळांच्या मिरवणुकीचे स्वागत करण्यात येत होते.

ढोल ताशांचा गजर, भंडाऱ्याची उधळण, पुष्पवृष्टी आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’चा जयघोष असा जल्लोष सुरु असताना चक्क खेडचे आमदार सुरेश गोरे स्वागत मंडपातून बाहेर पडले. अन् कमरेला ढोल बांधून तब्बल अर्धातास ढोल वाजविला. शिवाय ढोल-ताशाच्या तालावर ठेकाही धरल्याचे चित्र चाकणकरांना पाहायला मिळाले.

यावेळी त्यांच्या समवेत माजी जि.प. सदस्य किरण मांजरे व अन्य कार्यकर्तेही सहभागी झाले होते. आमदारांचा हा जोश पाहून कार्यकर्त्यांचा उत्साहाला आणखीनच उधाण आले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.