Chakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम

चाकण परिसरातील स्थिती; साडेसहा हजार पिशवी पाण्यात

एमपीसी न्यूज- खेड तालुक्यात मागील काही दिवसांत झालेल्या अवकाळी पावसाने कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. चाकण मार्केटमध्ये पावसात भिजून साडेसहा हजार पिशवी नुकसान झाले आहे. भिजलेल्या कांद्याचे पंचनामे करण्यात आले आहेत. आखाती देशांमध्ये निर्यात होण्यायोग्य कांदा भिजून सडल्याने या कांद्याची निवड करून स्थानिक बाजारात हा कांदा विक्री करावा लागत असल्याचे शेतकरी आणि व्यापार्यांनी सांगितले.

सध्या गावरान कांदा काढणीचे अखेरच्या टप्प्यातील काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र मागील काही दिवसांत अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची आणि व्यापाऱ्यांची धावपळ उडाली आहे खेडच्या पूर्व भागातील कांद्याची काढणी करून पात कापणी चालू असताना झालेल्या अवकाळी पावसामुळे शेकडो टन कांदा शेतातच खराब झाल्याच्या तक्रारी कांदा उत्पादकांनी केल्या आहेत. त्याच प्रमाणे चाकण मार्केटमध्ये कांदा आणल्यानंतर निवाऱ्याअभावी उघड्यावर ठेवण्यात आलेल्या कांद्याचेही लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

  • शेतकर्यांनी कांदा मार्केटमध्ये आणल्यानंतर झालेल्या नुकसानीचे शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी व्यापारी गुलाब गोरे-पाटील यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे. बाजार समिती प्रशासनाकडे याबाबत विचारणा केली असता चाकण मार्केट यार्डात भिजलेल्या कांद्याचे पंचनामे करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, चाकण मार्केटमध्ये कांदा निवाऱ्याला ठेवण्यासाठी ऑक्शन हॉल नसल्याने यापूर्वीही अनेकदा अवकाळी पावसाच्या तडाख्याने कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रभारी सचिव बाळासाहेब धंद्रे यांनी सांगितले कि, हे काम सुरु करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.