Chakan : चाकण औद्योगिक पट्ट्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी बैठक

एमपीसी न्यूज – चाकण औद्योगिक पट्ट्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ( Chakan ) परिवहन विभाग, वाहतूक विभाग, कंपन्यांचे प्रतिनिधी आणि अभ्यासकांची मर्सिडीज बेंज कंपनीमध्ये मंगळवारी (दि. 30) बैठक पार पडली. चाकण परिसरातील वाहतूक कोंडी आणि अपघतांची कारणे आणि उपाययोजना यावर बैठकीत चर्चा झाली. प्रत्येक विभागाने एकत्रितपणे प्रयत्न करत वाहतूक कोंडी आणि अपघात टाळता येतील, असे सांगण्यात आले.

माजी पोलीस महासंचालक जयंत उमराणीकर, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे, सहायक पोलीस आयुक्त सतीश कसबे, फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे सचिव दिलीप बटवाल, सहायक पोलीस निरीक्षक श्री चौरे, मुकुंद पुराणिक, मर्सिडीजचे श्री मंडपे, संतोष खराबी, प्रकाश धोंगडे, रवी हंगारगे, सिद्धाराम चडचणी, रवी धुतेकर, ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे पदाधिकारी आणि विविध कंपन्यांचे सुमारे अडीचशे प्रतिनिधी उपस्थित होते.

Pune : केसनंद येथे अनधिकृत बांधकामावर कारवाई

माजी पोलीस महासंचालक जयंत उमराणीकर म्हणाले, “अपघात होण्यामागे बहुतेक वेळा माणसाचा स्वतःवरील ताबा नसणे, बेशिस्त वाहतूक अशा गोष्टी कारणीभूत आहेत परंतु या अपघातांमध्ये एखादी व्यक्ती मृत्यू पावली तर त्या व्यक्तीचे पूर्ण कुटुंब उध्वस्त होते. कामगारांनी आपल्या कुटुंबाची काळजी घेऊन आपण जबाबदारीने व वाहतुकीचे सर्व नियम पाळून कामावर जावे, जास्तीत जास्त काही मिनिटे उशीर होईल. पण सुरक्षित कामावर जाणे व सुरक्षित घरी पोहोचणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी वाहतुकीचे नियम पाळा असे आवाहन त्यांनी केले.

फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजने त्यांच्या परिसरातील जे ड्रायव्हर वर्षभर अपघात करणार नाहीत त्यांना त्या वर्षाचा बेस्ट ड्राइवर हा अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात यावे असे उमराणीकर यांनी सुचविले. त्यावेळी फेडरेशनने अपघात न करणाऱ्या ड्रायव्हर यांना बेस्ट ड्राइवर अवार्ड देण्याचे मान्य केले.

उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी रस्त्यावरील अपघात व त्यात होणारे मृत्यू हा अतिशय गंभीर विषय बनत चालला असून त्यावर ताबडतोब उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे सांगत त्यासाठी त्यांनी ट्राफिकच्या नियमांची माहिती दिली. अपघात कमी करण्यासाठी प्रवाशांनी, वाहन चालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे असे सांगितले.

सहायक पोलीस आयुक्त कसबे यांनी सांगितले की, वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहतूक शाखेकडून जास्तीत जास्त प्रयत्न केले जातील. पोलीस कमी असल्याने ट्राफिक मॅनेज करण्यामध्ये खूप ताण येतो. अडचणी येतात त्याकरिता कंपन्यांनी वॉर्डन दिले तर आम्हाला काम करणे सोपे होईल व वाहतूक कोडीतून सुटका होण्यासाठी मदत होईल.

फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे सचिव दिलीप बटवाल म्हणाले, फक्त बेशिस्त वाहतूकीमुळे वाहतूक कोंडी होत नसून मुळात या परिसरात रस्त्यांच्या पायाभूत सुविधा कमी आहेत. त्यामुळे या परिसराच्या विकासाची वाढती गरज लक्षात घेता राष्ट्रीय रस्ते वाहतूक विभागाने ताबडतोब नाशिक फाटा ते राजगुरुनगर व तळेगाव चाकण शिक्रापूर रस्ता या रस्त्यांचे काम सुरू करणे गरजेचे आहे. जेणेकरून कामगारांना वेळेत पोहोचता येईल. कंपन्यांच्या उत्पादनांचे नुकसान होणार नाही. अपघातात होणारे मृत्यू देखील टाळता येतील.

हा परिसर अतिशय महत्त्वाचा असून मोठ्या प्रमाणात या परिसरातून भारत सरकारला कर दिला जातो. मोठ्या प्रमाणावर रोजगार या परिसरात दिले जात आहे. चाकण परिसरात सुमारे 15 लाख कामगार काम करत आहेत. सरकारने ताबडतोब गांभीर्याने या प्रश्नाची दखल घेऊन या परिसरात पुरेशा पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात. या परिसरात अपुरे रस्ते असल्याने याचा ताण वाहतुकीवर होतो. कंपन्यांच्या उत्पादनाचे नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी बऱ्याच कंपन्यांनी त्यांचे एक्सपान्शन शेजारील राज्यांमध्ये म्हणजे गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश अशा राज्यांमध्ये हलविले आहे. काही जाण्याच्या तयारीत आहेत.

श्री मंडपे यांनी प्रास्ताविक केले. संतोष खराबी यांनी सर्वांचे आभार ( Chakan ) मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.