Chakan : ईव्हीएम घोटाळ्याला शिवसेना घाबरत नाही; आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांचे प्रतिपादन

एमपीसी न्यूज – ईव्हीएम घोटाळा करा किंवा अन्य कुठला घोटाळा, जनशक्ती सोबत असल्याने शिवसेनेला कशालाही घाबरायचे काहीही कारण नाही, खेड विधानसभा आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद वाढली आहे, त्यामुळे या मतदारसंघाची शिवसेनेला कसलीही चिंता नाही, असे प्रतिपादन शिवसेनेच्या उपनेत्या आणि प्रतोद आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी चाकण (ता. खेड) येथे केले.

चाकणमध्ये रविवारी (दि.१०) आयोजित करण्यात आलेल्या हळदी-कुंकू समारंभात मार्गदर्शन करताना डॉ. गोऱ्हे बोलत होत्या. यावेळी आमदार सुरेश गोरे, कल्पना आढळराव पाटील, मनीषा गोरे, शिवसेनेच्या जिल्हा संघटक विजया शिंदे, नंदा कड, तनुजा घनवट, किरण मांजरे, तालुकाप्रमुख प्रकाश वाडेकर सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संखेने उपस्थित होत्या.

  • यावेळी डॉ. गोऱ्हे म्हणाल्या कि, पूर्वी खेड मधील महिलांची काळजी वाटत होती, मात्र तालुक्यात शिवसेनेचे आमदार झाल्याने महिलांना कसलाही त्रास होणार नाही, याची खात्री आहे. खेड, जुन्नर, आंबेगाव या भागात शिवसेनेची ताकद वाढली आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत खासदार शिवाजीराव आढळराव युतीच्या माध्यमातून निवडून आले होते. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत स्वतंत्रपणे लढून आमदार गोरे यांनी प्रचंड मताधिक्य मिळवून विजय प्राप्त केला आहे. लगतच्या अन्य तालुक्यांतही शिवसेनेची ताकद वाढली असल्याने शिरूर लोकसभा मतदारसंघाची चिंता करण्याची गरज नाही. जनता शिवसेनेच्या सोबत असल्याने ईव्हीएम घोटाळा करा किंवा अन्य कुठला घोटाळा शिवसेना कशाची चिंता करीत नाही.

यावेळी आमदार सुरेश गोरे, महिला पदाधिकारी यांनीही मनोगत व्यक्त केले. आमदार सुरेश गोरे मित्र मंडळाच्या वतीने हळदी कुकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमास शेकडो महिलांनी हजेरी लावली. प्रकाश वाडेकर यांनी सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.