Pune News : अमरावतीत हिंदुंची उत्स्फूर्त प्रतिक्रिया; अब हिंदू मार नहीं खाएगा – चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज – त्रिपुरामध्ये घटना घडली की नाही हा प्रश्न आहे. पण त्यासाठी अमरावती, नांदेड, मालेगाव मध्ये अशांतता पसरवणे हे कितपत योग्य आहे. त्यामुळे अमरावतीमध्ये जे घडलं ती, हिंदुंची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. अब हिंदू मार नहीं खाएगा, अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.‌ पुण्यात आयोजित एका कार्यक्रमापूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते. १९९३ च्या दंगलीत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी बोटचेपी भूमिका घेतली असती, तर मुंबईत हिंदू जिवंत राहिला नसता, असेही त्यांनी यावेळी मत व्यक्त केले.

अमरावतीतील घटनेवर सविस्तर बोलताना चंद्रकांतदादा पाटील पुढे म्हणाले की, त्रिपुरामध्ये घटना काय घडली, हे नीट कुणालाही माहिती नाही. त्यासंदर्भात एक व्हिडिओ बनवून व्हायरल केला जातो. त्यानंतर अमरावती, नांदेड, मालेगावमध्ये अशांतता पसरवली जाते. १५-२० हजारच्या संख्येने रस्त्यावर उतरून माजी मंत्री जगदीश गुप्तांसह अनेकांच्या कार्यालयाची तोडफोड करायची, याचा काय संबंध आहे? त्यामुळे शनिवारच्या घटनेत भाजपाचा हात असेल, तर त्यापूर्वीच्या तोडफोडीच्या घटनेत संजय राऊतांचा हात आहे का?

ते पुढे म्हणाले की, अमरावतीमध्ये शनिवारी जे घडलं, ती अब हिंदू मार नहीं खाएगा, अशी एक स्वाभाविक प्रतिक्रिया होती. यातून चिथावणी देण्याचा विषय येत नाही, तर खऱ्याला खरं म्हणणं ही आमची संस्कृती आहे. कारण जसे आम्ही रा. स्व. संघाचे स्वयंसेवक आहोत, तसेच हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंना वंदन करणारे कार्यकर्ते ही आहोत. हिंदूहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी १९९३ च्या दंगलीत बोटचेपी भूमिका घेतली आसती, तर मुंबईतला हिंदू जिवंत राहिला नसता. त्याच बाळासाहेबांचे वारसदार अमरावती, नांदेड, मालेगाव मध्ये झालेल्या घटनेवर काहीही बोलणार नाहीत. अन् शनिवारच्या उत्स्फूर्त प्रतिक्रियेमध्ये भाजपाचा हात आहे, असं म्हणत असतील; तर ठिक आहे.”

भाजपा नेत्यांच्या धरपकडीवर बोलताना पाटील म्हणाले की, अमरावती, नांदेड,मालेगाव मध्ये शुक्रवारी जे घडलं, त्यामध्ये ज्यांचा ज्यांचा हात आहे, त्यांना आधी अटक करा. नांदेडमध्ये भाजपा जिल्हाध्यक्षांनी बंदची हाक दिली आहे. त्या बंदवर आक्षेप घेणाऱ्यांनी शुक्रवारच्या घटनेतील १०० जणांना अटक केली आहे का, हे आधी स्पष्ट करावे, १५-३० हजारचा जमाव रस्त्यावर उतरून अशांतता पसरवतो. तेव्हा पोलिसांचे गुप्तहेर खातं करतं, तरी काय? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.