Talegaon Dabhade : पुणे महानगर नियोजन समिती निवडणुकीत घड्याळाने साधली अचूक वेळ!

एमपीसी न्यूज (प्रभाकर तुमकर) – राष्ट्रीय चिन्ह कमळ असलेला भाजपा पक्ष, शिस्तबद्ध पक्ष, संघटना जपणारा पक्ष, पक्षाने दिलेला आदेश पाळणारा पक्ष असा भाजपाचा नावलौकिक आहे. परंतु या नावलौकिकाला लाजिरवाणे वाटेल असे काहीतरी घडले. नुकत्याच लागलेल्या पीएमआरडीएच्या निकालातून हा भ्रमनिरास समोर आला. मावळमधील लहान नागरी क्षेत्रातून भाजपाला केवळ दोन मते मिळाली आणि बहुतांश नगरपरिषदांमध्ये सत्ताधारी असलेल्या भाजपच्या नेतृत्वाला धक्का बसला. मावळ तालुका भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र अचूक वेळ साधून हा बालेकिल्ला आता राष्ट्रवादीने काबीज केल्याचा अनुभव या निकालाने मावळ वासियांना दिला आहे.

तालुक्यातील तळेगाव नगरपरिषदेत 13 आणि लोणावळा नगरपरिषदेत 9 असे एकूण 22 नगरसेवक हे भाजपच्या चिन्हावर निवडून आलेले आहेत. पीएमआरडीएच्या या निवडणुकीत लहान नागरी मतदारसंघात भारतीय जनता पक्षाची एकूण 36 नगरसेवक मतदार संख्या आहे. त्यापैकी मावळ तालुक्यात 22 सदस्य मतदार म्हणून होते.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे सभागृह नेते अरुण भेगडे यांनी भाजपकडून पीएमआरडीए नियोजन समितीची निवडणूक लढवली. अरुण भेगडे ज्या शहराचे नेतृत्व करतात, त्या शहरात त्यांच्या हक्काची (भाजप) 13 मते होती. तर बालेकिल्ल्याच्या लोणावळा नगरपरिषदेतील 9 मते होती.

पण या निवडणुकीत त्यांना केवळ दोन मते मिळाली. त्यामुळे भारतीय जनता पक्षातील शिस्त आणि निष्ठा या गोष्टी संपुष्टात आल्याचे दिसत आहे. मावळ तालुक्यातील या 22 मतदारांनी अरुण भेगडे यांना मतदान केले असते तरी पक्षाची एकनिष्ठ व शिस्तपणाची अब्रू वाचली असती.

पीएमआरडीए निवडणुकीपूर्वी आमदार सुनील शेळके यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या नेत्यांनी काँग्रेसबरोबर हातमिळवणी करुन निष्ठेला तिलांजली दिल्याचा आरोप केला होता. आमदार शेळके यांनी भाजपचे नेते, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यावर जोरदार टीका केली होती.

तर भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनीही लगेच तातडीने पत्रकार परिषद घेऊन शेळके यांनी केलेले आरोप फेटाळून लावले होते. ‘आम्ही निष्ठावान’ असा दावा या पत्रकार परिषदेत जणू भाजपने केला.

शेळके यांना पराभव समोर दिसत असल्याने संभ्रम निर्माण करण्यासाठी शेळके आरोप करीत असल्याचा दावा भाजपने केला होता. भाजपने काँग्रेसशी हातमिळवणी केल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी फेटाळून लावला.

मात्र, तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेला एकही नगरसेवक नसताना संतोष भेगडे यांना तब्बल 57 मते मिळाली तर भाजपची 36 मते असताना अरुण भेगडे यांना केवळ 2 मते मिळाली. पुढे जाऊन काँग्रेसच्या विजय वढणे यांना 52 मते कशी मिळाली, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

पुणे महानगर नियोजन समितीच्या निवडणुकीत लहान नागरी क्षेत्रातून मावळातून एका जागेसाठी तीन उमेदवार रिंगणात होते. त्यात राष्ट्रवादीचे उमेदवार संतोष भेगडे विजयी झाले. दुसऱ्या क्रमांकाची मते काँग्रेसला, तर तिसऱ्या क्रमांकाची मते भाजपला पडली.

ग्रामीण गटातील दोन जागांवर राष्ट्रवादीच्या दीपाली हुलावळे, भाजपचे कुलदीप बोडके विजयी झाले. मावळातील तळेगाव, लोणावळा नगरपरिषदेत भाजपचे प्राबल्य असतानाही भाजपचा उमेदवार पराभूत झाल्याने पक्षाने अपयशाची कारणमिमांसा सुरू केली आहे.

विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्षपदी माजी मंत्री संजय (बाळा) भेगडे असताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्ह्यातून हद्दपार करून टाकू अशी घोषणा केली होती. विधानसभेच्या निवडणुकीत जिल्ह्य़ातून काही मर्यादित ठिकाणीच भाजपाला विधानसभेवर विजय मिळवता आला.

या पीएमआरडीएच्या निवडणुकीत मोठे नागरी मतदारसंघात विजयी मिळवता आला परंतु लहान नागरी मतदारसंघात पराभवाची नामुष्की स्विकारावी लागली. यामुळे भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये पक्षसंघटना, पक्षशिस्त याबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे व निष्ठावंत नाराज झाल्याचे चित्र दिसत आहे.

या निवडणुकीच्या एक दिवस अगोदर आमदार सुनील शेळके यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपाची निष्ठा व शिस्त हे निवडणुकीच्या निकालानंतर राहील का, हे पहावे याबाबत मांडलेले मत खरे ठरल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यामध्ये उत्साह संचारल्याचे दिसत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.