Charholi : चऱ्होलीचे पाणी वळविले कुठे?

एमपीसी न्यूज – चऱ्होली गावठाणासह परिसरातील वाड्यावस्त्यांवर (Charholi ) अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे येथील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. एकीकडे सध्या शटडाऊनमुळे पाणीटंचाई जाणवत असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. तर चऱ्होलीचे पाणी अन्यत्र वळवले जात आहे. किंवा प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे या भागात पाणीटंचाई जाणवत आहे असा आरोप येथील  पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे.

चऱ्होली गावठाणासह बुर्डे वस्ती, सरपंच वस्ती, पठारे वस्ती, अजिंक्‍य डी. वाय. पाटील कॉलेज परिसर, लोहगाव व निरगुडी रस्ता परिसरात गेल्या काही महिन्यांपासून अपुरा पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. मागील चार दिवसांपासून घरात पाणीच आले नाही अशा तक्रारी करत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

या भागाला मोशी-प्राधिकरण पेठ क्रमांक चारमधील जलकेंद्रातून पाणीपुरवठा केला जातो. त्याअंतर्गत मोशी, गंधर्वनगरी, डुडुळगाव, वडमुखवाडी व चऱ्होलीगाव येथील टाक्‍यांमध्ये एकाच जलवाहिनीद्वारे पाणी साठविले जाते. चऱ्होली गावठाणातील टाकी सर्वांत शेवटी असल्याने पूर्ण क्षमतेने भरत नाही. त्यामुळे अपुरा पाणीपुरवठा होतो. गेल्या चार महिन्यांपासून हाच प्रकार सुरू आहे. नागरिकांना पूर्ण क्षमतेने व्यवस्थित आणि सुरळीत पाणीपुरवठा होत नाही वारंवार तक्रारी करूनही प्रशासकीय राजवटीत कोणी ऐकूनच घेत नाही असे देखील नागरिकांचे म्हणणे आहे.

Chinchwad : सोशल मिडीयावरची ओळख पडली महागात, महिलेची पावणे दोन लाखांची फसवणूक

या भागातील बहुतांश नागरिक विहिरी व बोअरवेलचे पाणी वापरत आहेत. या भागातील अनेक नागरिक शेतामध्येच घरे बांधून राहात आहेत. त्यांनी नळजोड घेतले आहेत.

मात्र, त्यांना पुरेसे पाणी मिळत (Charholi ) नसल्याने विहिरी किंवा बोअरवेलचे पाणी वापरावे लागते. टॅंकरच्या पाण्यात क्षाराचे प्रमाण अधिक असल्याने पिण्यास अयोग्य आहे. नळांद्वारे पुरेसा पाणीपुरवठा व्हावा, अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत.

माजी नगरसेविका विनया तापकीर म्हणाल्या, “मोशी, गंधर्वनगरी, डुडुळगाव, वडमुखवाडी व चऱ्होलीगाव येथील टाक्‍या पूर्ण क्षमतेने भरत नाहीत. आता शटडाऊनचे कारण सांगून प्रशासन वेळ मारून नेत आहे. मात्र असे वारंवार का होते, याचे उत्तर प्रशासनाकडे नाही. या भागात गेल्या वर्षभरापासूनच पाण्याची प्रचंड टंचाई आहे.

प्रशासन जाणीवपूर्वक या भागातील पाणी इतरत्र वळवत आहे असा आमचा आरोप आहे. अन्यथा याच भागाला पाणीटंचाई का होते. अतिरिक्त पाणी देण्याचे गाजर दाखवण्यात आले ते पाणी तर मिळाले नाहीच. शिवाय हक्काचे पाणी देखील दुसरीकडे वळवले जात आहे.

पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रामनाथ टकले म्हणाले, “दोन दिवसांपूर्वी शहरात शट डाऊन घेण्यात आला होता. या भागातही शट डाऊनचाच परिणाम झालेला आहे. कोणताही शट डाऊन घेतल्यानंतर 400 ते 500 एमएलडी पाण्याचा फटका बसतो.

हा फटका रिकव्हर होण्यासाठी वेळ लागतो. सध्या यामुळे चऱ्होली भागातील पाण्याच्या टाक्या पूर्ण क्षमतेने भरल्या नाहीत आणि या भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. पाणी अन्यत्र वळवण्याचा काही संबंध येत नाही. शटडाऊन नंतर सर्वांना पुरेसे पाणी मिळावे असा प्रशासनाचा प्रयत्न असतो. तोच प्रयत्न केला जात (Charholi ) आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.