IPL News : चेन्नई सुपर किंग्जने रोमांचक विजयासह प्ले ऑफ मधले स्थान केले पक्के, सहा गडी राखून हैदराबाद संघावर केली मात

एमपीसी न्यूज :  (विवेक कुलकर्णी) उपांत्यपूर्व फेरीचे लक्ष डोळ्यापुढे ठेवून खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जने सनरायजर्स हैदराबादवर मोठा विजय मिळवत आणखी एक दमदार विजय मिळवून या आयपीएल मध्ये पहिल्या क्रमांकावर विराजमान होत कॉलीफाय होणारी पहिली टीम होण्याची कामगिरीही केली आहे. 

चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकून सनरायजर्स हैदराबादला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मागच्या सामन्यात दमदार खेळ करणाऱ्या जेसन रॉयने वृद्धीमान साहा बरोबर डावाची सुरुवात केली खरी,पण जेसन रॉयला आज आधीसारखा खेळ करता आला नाही, तो केवळ दोन धावा करून हेजलवूडच्या गोलंदाजीवर धोनीच्या हातुन झेलबाद झाला.

यावेळी संघाच्या 23 धावा झाल्या होत्या, रॉयच्या जागी कर्णधार केन विल्यमसन आला, त्याने वृद्धीमानच्या साथीने आणखी 20 धावा जोडल्या असताना केन केवळ वैयक्तिक 10 धावांवर ब्रावोच्या चेंडूवर पायचीत झाला. त्याच्या जागी आलेला युवा प्रियम गर्ग सुद्धा केवळ 7 धावा काढून ब्रावोचाच दुसरा बळी ठरला, दुसऱ्या बाजूने साहा टिकला आहे असे वाटत असतानाच तो सुद्धा वैयक्तिक 44 धावा करून जडेजाच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला.

यामुळे सनरायजर्स हैदराबादच्या धावसंख्येला चांगलीच खीळ बसली, शेवटच्या काही षटकात अभिषेक शर्मा, अब्दुल समद आणि रशीद खान यांनी काही साहसे फटके मारून संघाला कसेबसे 134 पर्यंत पोहचवले खरे पण ही धावसंख्या सीएसके सारख्या मजबूत संघाविरुद्ध विजय मिळवायला नक्कीच पुरेशी नव्हती.

सीएसके कडून हेजलवूडने सर्वाधिक तीन बळी मिळवले तर ब्रावोने दोन, तर जडेजा आणि ठाकूरने एकेक बळी मिळवत हैदराबादला रोखून धरण्यात मोठा वाटा उचलला. हैदराबादकडून साहाच्या 44 धावा सोडल्या तर बाकी फलंदाज चांगल्या सुरूवातीनंतरही विशेष कामगिरी करू शकले नाहीत.

केवळ 135 धावांचे आणि अंतिम चार मधली पहिली टीम होण्याचे लक्ष डोळ्यासमोर ठेवून खेळणाऱ्या चेन्नईला ऋतुराज आणि डूप्लेसीने धडाकेबाज सुरुवात करून दिली. या स्पर्धेत सुरुवातीपासून भरात असलेल्या ऋतूराजने आजही जोरदार फलंदाजी केली, त्याची फलंदाजी आज तर दुप्लेसीपेक्षा जास्त आक्रमक वाटत होती, आणखी एक अर्धशतकी खेळी तो सहज करेल असे वाटत असतानाच तो 38 चेंडूत 45 धावा काढून होल्डरच्या गोलंदाजीवर विल्यमसनच्या हातून झेलबाद झाला.

ज्यात त्याने चार चौकार आणि दोन षटकार मारले होते. यावेळी संघाची धावसंख्या 10 षटकातच 75 झाली होती. त्यामुळे चेन्नई संघ विजयाकडे आरामात वाटचाल करत होता, असे वाटत असताना आधी मोईन अली वैयक्तिक 17 व सुरेश रैना केवळ 2 धावांवर बाद झाल्याने हैदराबाद संघ काही चमत्कार करेल अशी आशा त्यांच्या समर्थकाना होती त्यातच होल्डरने रैना पाठोपाठ जम बसलेल्या डूप्लेसीला सुद्धा बाद करून सामन्यात रंगत निर्माण केली.

अचानक झालेल्या या पडझडीने चेन्नईला पराभव मिळतो की काय असे चित्र निर्माण झाले होते,त्यातच बॉल कमी आणि आवश्यक धावा जास्त अशी परिस्थिती होती, अचानक धावांचा ओघ आटला,चमत्कार होईल का असे वाटत असताना धोनीचा एक अवघड झेल जेसन रॉयच्या हातून सुटला, अन नेमके याच दरम्यान अंबाती रायडूने एक चौकार आणि एक षटकार मारत विजय आणखी सोपा केला.

शेवटच्या षटकात सहा चेंडूत 3 धावा हव्या असताना सिद्धार्थ कौलने पहिल्या तीन चेंडूत एकच धाव देत थोडाफार रोमांच निर्माण केला खरा पण महेंद्रसिंग धोनीने एक उत्तुंग षटकार मारत संघाला सहा गडी राखून मोठा विजय मिळवून दिला अन याचसोबत आयपीएल 2021 मध्ये पहिल्या चार स्थानासाठी पात्र होणारी पहिली टीम हा मान ही मिळवला, योगायोग म्हणजे मागील वर्षीच्या स्पर्धेत स्पर्धेबाहेर पडणारी पहिली टीम सीएसकेच होती. अतिशय किफायतशीर गोलंदाजी करत आयपीएल मधले वैयक्तिक सर्वोत्तम प्रदर्शन करून तीन बळी मिळवणार हेजलवूड सामन्याचा मानकरी ठरला

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.