Pune : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांची आजच्या समाजाला गरज – प्रा. संतोष थोरात

एमपीसी न्यूज – आनंद विद्या निकेतन हायस्कूल विमाननगर पुणे 14 मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे नियोजन आनंद विद्या निकेतन हायस्कूल, विमाननगर व हिंद इंग्लीश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक घोगे सर यांनी मांडून कार्यक्रमाची सुरुवात केली. 

याप्रसंगी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील विविध प्रसंग सादर केले. हिंद इंग्लीश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अफझलखानच्या वधाचे नाट्य सादर केले. मुलांनी पोवाडयाच्या माध्यमातून शिवरायांची शौर्य गाथा मांडली.

याप्रसंगी विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्या वेशभूषा केल्या होत्या. संतोष थोरात सरांनी छत्रपती शिवरायांचा इतिहास विद्यार्थी यांच्यासमोर मांडून आजच्या काळात समाजाला शिवछत्रपतींच्या विचारांची, गुणांची गरज आहे हे स्पष्ट  केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत गोरोबा शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डाॅ. नामदेवराव सावंत होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करून शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी आनंद विद्या निकेतन हायस्कूल विमाननगर पुणेचे मुख्याध्यापक  नितीन  घोगे सर, हिंद इंग्लीश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका डाॅ. प्रीती मानेकर व दोन्ही शाळेतील शिक्षक बंधू भगिनींनी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण मासाळ सरांनी केले. व नियोजन सर्व शिक्षक बंधू भगिनींनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.