Chikhali Crime News : देहू-मोशी रस्त्यालागत उभ्या राहणाऱ्या ट्रकमुळे चोरट्यांचे फावतेय

पादचारी महिलेला दोघांनी ट्रकच्या आडोशाला ओढले; नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला

एमपीसी न्यूज – देहू-मोशी रस्त्याच्या बाजूला पार्क केल्या जाणा-या ट्रकच्या आडोशाला थांबून महिलांची छेड काढणे, सोनसाखळी हिसकावणे असे गंभीर प्रकार घडत आहेत. एका पादचारी महिलेला ट्रकच्या आडोशाला ओढून तिच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याचा दोघांनी प्रयत्न केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. त्यामुळे रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या ट्रकमुळे चोरट्यांचे फावतेय. त्यांना गुन्हे करण्यासाठी या ट्रकचा आडोसा मिळत असल्याचे नुकत्याच घडलेल्या चोरीच्या प्रयत्नावरून स्पष्ट होते. 

देहू-मोशी रस्त्यावर गायत्री लीगसी सोसायटी आहे. त्या सोसायटी जवळ एक महिला, त्यांचा दहा वर्षांचा मुलगा आणि शेजा-यांची दहा महिन्याची मुलगी असे तिघेजण एक फेब्रुवारी रोजी रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास पायी चालत जात होते. रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या ट्रकच्या आडोशाला थांबलेल्या दोन चोरट्यांनी अचानक महिलेला ट्रकच्या दिशेने ओढले आणि महिलेच्या गळ्यातील दागिने चोरण्याचा प्रयत्न केला.

महिलेच्या मुलाच्या हातात मोबाईल फोन होता. तो मोबाईल फोन हिसकावण्यासाठी एक चोरटा मुलाच्या मागे पळू लागला. मात्र, मुलाने तात्काळ शेजा-या सोसायटीमधील सुरक्षा रक्षकाकडे धाव घेतली आणि आरडाओरडा केला. त्यामुळे रस्त्याच्या बाजूला थांबलेले दोन तरुण महिलेच्या दिशेने पळत आले. कुणीतरी आपल्या दिशेने येत असल्याचे पाहून चोरट्यांनी महिलेला सोडून तिथून पळ काढला.

महिलेचा मुलगा, स्थानिक नागरिक यांनी वेळीच प्रसंगावधान दाखवल्यामुळे मोठा अनर्थ टळला. चोरट्यांना महिलेच्या गळयातील दागिने चोरून नेता आले नाहीत. या प्रकारामुळे महिला घाबरली. त्यांचे पती कंपनीच्या कामानिमित्त राज्याच्या बाहेर गेले असल्याने त्यांनी पोलिसात तक्रार केली नाही. दरम्यान एका सोसायटीच्या वतीने पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे.

रस्त्याच्या बाजूला पार्क होणा-या ट्रकमुळे असे प्रकार घडण्यासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. चिखली, मोशी परिसरात रस्त्याच्या बाजूला पार्क होणा-या ट्रक पोलिसांची डोकेदुखी होत आहेत. शहराचे पहिले पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी परिसरात सर्व ट्रान्सपोर्ट आणि कंपन्यांनी त्यांच्या ट्रकसाठी सुरक्षित पार्किंग व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

तसेच ट्रक चालकांनी उघड्यावर अंघोळ, शौच करू नये, रस्त्यावर दारू पिऊ नये याबाबत देखील संबंधितांना सूचना दिल्या होत्या. त्यानंतरही रस्त्याच्या बाजूला पार्क होणा-या ट्रक हटत नाहीत. यामुळे अनेक गैरप्रकार वाढण्याची भीती नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.