Chikhali News : नवरा काम करत नाही तर माहेरहून पैसे आण, असे म्हणत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज – ‘नवरा काही काम धंदा करीत नाही तर तू तुझ्या माहेरहून पैसे घेऊन ये’, असे म्हणत सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ केला. तसेच दिराने विवाहितेवर चाकूने वार करून जखमी केले. ही घटना त्रिवेणीनगर, तळवडे येथे मागील दोन वर्षांपासून 25 डिसेंबर 2021 या कालावधीत घडली.

पती श्रीकांत प्रकाश परब, सासरे प्रकाश भगवान परब (वय 65), सासु (वय 55), दीर श्रीकृष्ण प्रकाश परब (वय 38), एक महिला (वय 37, सर्व रा. त्रिवेणीनगर, तळवडे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी 28 वर्षीय पीडित महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या पतीने त्यांच्यावर संशय घेऊन दारू पिऊन वारंवार शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच अन्य आरोपींनी फिर्यादी यांच्या पतीला न समजावता उलट ‘नवरा काही काम धंदा करीत नाही तर तू तुझ्या माहेरहून पैसे घेऊन ये’, असे म्हणत शिवीगाळ करून मारहाण केली. डिसेंबर रोजी आरोपी दीर श्रीकृष्ण याने फिर्यादी महिलेवर चाकूने वार करून त्यांना जखमी केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक गुमाने तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.