Pune News : भीमा कोरेगावला जास्त गर्दी होऊ नये ; रामदास आठवले यांचे आवाहन

एमपीसी न्यूज – ‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भीमा कोरेगावला जास्त गर्दी होऊ नये, अशी अधिकाऱ्यांनी विनंती केली आहे. त्याला प्रतिसाद देत मीही कार्यकर्त्यांना एक जानेवारीला भीमा कोरेगावला दर्शनासाठी गर्दी करू नये. कोरोनाबाबतीत नियमांचे पालन करून अनुयायांनी दर्शनासाठी यावे,’ असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले.

‘गो महाविकास आघाडी गो’ असा नारा देत आठवले यांनी राज्य सरकारवर टीका केली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पुणे शहराच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत उपमहापौर सुनीता वाडेकर, ‘रिपाइं’चे शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, संपर्कप्रमुख अशोक कांबळे, अशोक शिरोळे, ऍड. आयुब शेख, ऍड. मंदार जोशी, सचिव महिपाल वाघमारे, असीत गांगुर्डे, संजय सोनवणे, निलेश आल्हाट, मोहन जगताप श्याम सदाफुले, जयदेव रंधवे आदी उपस्थित होते.

रामदास आठवले म्हणाले, ‘भीमा कोरेगाव स्तंभाजवळील 20 हेक्टर जमीन शासनाने जमीन मालकांना योग्य मोबदला देऊन ताब्यात घ्यावी. त्या जागेवर आंतरराष्ट्रीय स्मारक व्हावे. पुरातत्व खाते, पर्यटन खात्याच्या वतीने तेथे स्मारक उभे राहावे. अनुयायांना केवळ एक जानेवारीलाच नव्हे, तर कायम येता येईल, दर्शन घेता येईल, अशी व्यवस्था उभारावी. ग्रंथालय, संग्रहालय उभारावे. महार बटालियन आणि पोलिसांनीही विजयस्तंभाला मानवंदना द्यावी.’

‘गो महाविकास आघाडी गो’

आपल्या मिश्किल कवितांसाठी रामदास आठवले प्रसिद्ध आहेत. ‘गो कोरोना गो’ ही घोषणा जगभर गाजली. आता ओमिक्रोन आला असला, तरी त्याचा प्रभाव फारसा नाही. त्यामुळे यापुढील काळात माझा नारा ‘गो महाविकास आघाडी गो’ असा असणार आहे. तीन चाकांचे हे सरकार एकमेकांवर कुरघोडी करण्यात मग्न आहेत. शेतकऱ्यांना अजून मदत नाही. दलितांना सुविधा मिळत नाहीत. यंदाच्या बजेटमध्ये तरतूद करावी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.