Chikhali News : ‘ताम्हाणेवस्तीतील रस्त्यावरील अतिक्रमण हटवा; अन्यथा कायदेशीर कारवाई’ 

शिवसेनेचा महापालिका आयुक्तांना इशारा

0

एमपीसीन्यूज : ताम्हाणेवस्ती  येथील गणेश हौसिंग सोसायटीच्या रस्त्यातील अनधिकृत बांधकाम रहदारीला अडथळा ठरत आहे. त्यामुळे सोसायटीतील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने  संबंधित बांधकाम येत्या सात ते  दहा दिवसांत   हटवून या रस्त्याचे  डांबरीकरण करावे; अन्यथा  स्थापत्य विभाग, नगररचना विभाग आणि बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम विभागाविरोधात   कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा  शिवसेना भोसरी विधानसभा संघटक व  महाराष्ट्र वितरक सेनेचे जिल्हाध्यक्ष  रावसाहेब  थोरात यांनी दिला आहे. 

या संदर्भात थोरात यांनी महापालिका आयुक्त  राजेश पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. तसेच रस्त्यातील अतिक्रमणामुळे निर्माण झालेली समस्या, त्याचा सोसायटीतील नागरिकांना सहन करावा लागणारा त्रास याचा पाढाच त्यांनी आयुक्तांसमोर वाचला. यावेळी शिवसेना उपशहरप्रमुख नेताजी काशिद, सामाजिक कार्यकर्ते राहुल सिंग, वैभव थोरात उपस्थित होते.

याबाबत माहिती देताना थोरात म्हणाले,  ताम्हाणे वस्ती, हनुमान नगर येथील गणेश हौसिंग सोसायटीच्या रस्त्यात अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे.  हा भाग दाट लोकवस्तीचा आहे. अनधिकृत बांधकामामुळे मूळ  20 फुटी रस्ता 11 फूट झाला आहे.

या बाबत वर्षभरापासून  महापालिका आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे  अनधिकृत बांधकाम हटविण्यासाठी व रस्त्याच्या डांबरीकरण करण्याच्या मागणीसाठी   वारंवार  पत्रव्यवहार आणि आंदोलन केले. मात्र, वर्ष झाले तरी रस्त्यातील अनधिकृत बांधकाम ‘जैसे थे’ आहे.

या आधी तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी रस्त्यातील अनधिकृत बांधकाम हटविण्याचे आदेश दिले होते.  मात्र, त्यांच्या आदेशाला अनधिकृत बांधकाम विभागाने केराची टोपली दाखविली.

_MPC_DIR_MPU_II

हे प्रकरण न्याय प्रविष्ठ असले तरी या  बांधकामाबाबत कारवाईसाठी न्यायालयाचा कोणताही स्थगिती आदेश नाही. अनधिकृत बांधकाम विभागानेही कंपाउंड करण्यास लेखी परवानगी नाकारली आहे. शिवाय मूळ जागामालकाने संबंधित जागा गणेश हौसिंग सोसायटीला हस्तांतरित केली आहे.  दहा वर्षांपूर्वी  महापालिकेच्या वतीने तीन वेळा या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते.

तीनवेळा रस्त्याचे डांबरीकरण झाले त्यावेळी  जागेच्या मालकीचा विसर पडला आणि  वर्षभरापूर्वी  रस्त्यात अतिक्रमण करुन संबंधित  जागेवर  कसा काय हक्क सांगितला जातो, असा सवाल थोरात यांनी उपस्थित केला आहे.

या अनधिकृत बांधकामाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत असेल आणि यात स्थापत्य विभाग, नगररचना विभाग आणि बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम विभागाचे अधिकारी सहभागी असतील तर त्यांच्याविरोधात  लवकरच न्यायालयात दावा दाखल करण्यात येईल, असा इशारा थोरात यांनी दिला आहे.

‘कोर्टाच्या निकालानुसार होणार कारवाई’

त्रिवेणीनगर येथील गणेश हौसिंग सोसायटीच्या रस्त्यात केलेल्या अतिक्रमणाचे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत कोणतीही कारवाई करु नये, अशी न्यायालयाची सूचना आहे. त्यामुळे न्यायालयाचा जो निकाल लागेल त्यानुसार कारवाई केली जाईल, अशी माहिती बांधकाम व अतिक्रमण विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1
Leave a comment