Chikhali News: घरकुलमधील दोन सदनिकांची विक्री, 198 सदनिका भाड्याने, 1223 बंद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या चिखली येथील घरकूल प्रकल्पातील सदनिकांची महापालिका, पोलिसांच्या पथकाने 5838 तपासणी केली. त्यामध्ये 1223 सदनिका बंद आढळून आल्या. 198  सदनिकांमध्ये भाडेकरू आढळून आले. तर, दोन सदनिका विक्री झाल्याचे आजच्या प्राथमिक तपासणीत आढळून आले.

आयुक्त राजेश पाटील यांच्या आदेशानुसार सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांच्या पथकाने ही तपासणी केली. आर्थिक दुर्बल घटकासाठी उभारण्यात आलेल्या या प्रकल्पातील पात्र लाभार्थ्यांना सदर सदनिका 10 वर्षांपर्यंत विकता येत नाहीत. तसेच भाड्याने देता येत नाहीत. या अटींचे उल्लंघन झाल्यास सदर लाभार्थ्यांचा लाभ रद्द करून ताब्यात घेण्याची तरतूद आहे. त्यासाठी आज विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली.

चिखली पोलीस स्टेशनचे निरीक्षक सतीश माने यांच्या उपस्थितीत व 35 पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने ही तपासणी मोहीम राबवण्यात आली. सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आलेल्या या मोहिमेत कार्यकारी अभियंता शिरीष पोरेड्डी, प्रशासन अधिकारी श्रीकांत कोळप यांच्यासह 14  मंडलाधिकारी, वरिष्ठ लिपीक, लिपीक, मजूर व शिपाई असे 189 कर्मचारी सहभागी होते.

5838 सदनिकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 1223 सदनिका बंद आढळून आल्या. 198  सदनिकांमध्ये भाडेकरू आढळून आले. तर दोन सदनिका विक्री झाल्याचे आजच्या प्राथमिक तपासणीत आढळून आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.