Chikhali News : चिखलीत सर्वधर्मीय मोफत विवाह सोहळ्यास प्रारंभ; पहिल्या टप्प्यातील दोन विवाह उत्साहात

एमपीसीन्यूज : कोरोना संकटामुळे सर्वसामान्यांसह हातावर पोट असणाऱ्या गरिबांची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक बनली असताना गोरगरिब नागरिकांच्या मुला-मुलींच्या विवाहांची जबाबदारी चिखली गावातील जय भवानी प्रतिष्ठाणचे अध्यक्ष जितेंद्र यादव आणि त्यांच्या पत्नी शीतल यादव यांनी स्वतःच्या खांद्यावर घेत यशस्वीरीत्या पार पडली. या सोहळ्याच्या माध्यमातून वधू पित्याच्या खांद्यावरचे ओझे हलके झाल्याचे समाधान मिळाल्याची भावना सोहळ्याचे आयोजक यादव दाम्पत्याने व्यक्त केली.

स्वर्गीय अलकाताई यादव प्रतिष्ठाण आणि जय भवानी प्रतिष्ठाण यांच्या संयुक्त विद्यमाने चिखलीत नुकतेच दोन मोफत विवाह सोहळे उत्साहात पार पडले. महेश थोरात आणि पूनम मिसाळ यांचा विवाह चिखली गावातील दत्त मंदिराच्या सभामंडपात, तर लक्ष्मण वाघमारे आणि कोमल निसर्गंध यांचा मंगल परिणय सोहळा चिखली गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनात पार पडला.

लग्न मंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ सँनेटायझरची व्यवस्था करण्यात आली होती. मंडपात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मास्क लावण्यविषयी सुचना केल्या जात होत्या. मंडपात ठराविक अंतरावर खुर्च्या ठेवून सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यात आले. लग्न सोहळा पार पडून वऱ्हाडी मंडळींचे जेवण आणि वधूची पाठवणी होईपर्यंत जितेंद्र यादव आणि शीतल यादव हे दाम्पत्य
एखाद्या कुटुंब प्रमुखाप्रमाणे सर्व व्यवस्था हाताळत होते.

या विवाह सोहळ्यासाठी लग्न मंडपाची आकर्षक सजावट, सनई चौघड्याचे मंगल स्वर, वऱ्हाडी आणि वधू-वरांच्या स्वागतासाठी वाजंत्री मंडळी, भटजी, मंगलाष्टका, लाऊडस्पीकर, जेवण, वधू-वरांसाठी प्रत्येकी कपड्यांचे तीन जोड, संसारोपयोगी साहित्य अशी सर्व व्यवस्था करण्यात आली होती.

हा विवाह समारंभ कोरोनाचे नियम व महापालिका आणि शासन निर्देशांचे पालन करून आयोजित करण्यात आला. आतापर्यंत सर्वधर्मीय मिळून एकूण 13 विवाहांची नोंद झाली आहे. कोरोना संकट असेपर्यंत ही नोंदणी सुरु राहणार आहे. यातील दोन विवाह 4 जूनला पार पडले. उर्वरित विवाह टप्प्याटप्प्याने आयोजित केले जाणार असल्याचे जितेंद्र यादव यांनी सांगितले.

वधू पित्याच्या खांद्यवरचे ओझे हलके झाल्याचे समाधान

लॉकडाऊनमुळे प्रत्येकाचे आर्थिक गणित कोलमडले आहे. अशा कठीण परिस्थितीत मुला-मुलींची लग्न कार्ये ठरलेल्या कुटुंबांची पैशांअभावी घालमेल सुरु होती. अशा गोरगरीब कुटुंबांना आधार देण्यासाठी मोफत सर्वधर्मीय विवाह समारंभाचे आयोजन केले. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेष बाब म्हणजे गरीब कुटुंबातील मुलींच्या लग्नाची जबाबदारी पार पाडण्याचे भाग्य लाभले. त्यामुळे वधू पित्याच्या खांद्यावरचे ओझे हलके झाल्याचे मोठे समाधान या विवाह सोहळ्यातून मिळाले. जितेंद्र यादव : सामाजिक कार्यकर्ते

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.