Chikhali News : चिखली-मोरेवस्ती येथे नवदुर्गा सखी मंचाच्या नामफलकाचे अनावरण 

एमपीसीन्यूज  : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून चिखली -मोरेवस्ती  येथे  रुपाली पांडुरंग साने यांच्या पुढाकारातून  स्थापन करण्यात आलेल्या नवदुर्गा सखी मंच या संस्थेच्या नामफलकाचे अनावरण  चिखली पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक  दीपाली मुंडकर  यांच्या हस्ते आज, मंगळवारी करण्यात आले.

मोरेवस्ती येथील साने कॉलनीत भाजपचे युवा नेते पांडुरंग साने यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर  हा उदघाटन सोहळा पार पडला. प्रमुख पाहुण्या म्हणून  भाजप प्रभाग क्रमांक एकच्या अध्यक्षा  मीना बावकर,  महिला आर्थिक  विकास महामंडळाच्या विभागीय समन्वयक  रजनी हाके, भाजपचे युवा नेते पांडुरंग साने आदी उपस्थित होते.

या वेळी आयोजित स्त्री शक्ती सन्मान सोहळ्यात  परिसरातील  महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

मुख्य संयोजिका रुपाली साने म्हणाल्या, या मंचमध्ये पाचशे महिलांची नोंदणी झाली आहे.  महिलांचा सर्वांगीण  विकास व्हावा यासाठी  या मंचाची स्थापना करण्यात आली आहे. महिला सबलीकरणावर  या मंचाच्या माध्यमातून  विशेष भर देण्यात येणार आहे.  आगामी काळात स्थानिक  महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी  विशेष प्रयत्न  केले  जातील, अशी माहिती साने यांनी दिली.

तर महिला आर्थिक विकास महामंडळाच्या विभागीय समन्वयक रजनी हाके यांनी  महिला बचत गटांच्या सक्षमीकरणाविषयी मार्गदर्शन  केले. महिलांनी अर्थार्जन करण्यावर भर द्यावा.  महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध  करण्यासाठी प्रयत्न केले जातील.

 

या वेळी पोलीस उपनिरीक्षक  दीपाली मुंडकर, भाजप प्रभाग क्रमांक एकच्या अध्यक्षा  मीना बावकर,  महिला आर्थिक  विकास महामंडळाच्या विभागीय समन्वयक  रजनी हाके आदींसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा स्त्री शक्ती सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

प्रास्ताविक सविता वाघे यांनी केले. आभार शारदा साने यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.