Chikhali News : पावसाळ्यात घरकुलमध्ये साचते पाणी; नागरिकांना होतोय त्रास

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिखली येथे बांधण्यात आलेल्या घरकुल या गृहप्रकल्पातील पार्किंग, तळमजल्यावर दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचते. थोडा पाऊस पडला तरी पाण्याचे तळे तयार होते. त्यामुळे वीज पुरवठा खंडित होतो. शिवाय लिफ्टचा खालील भाग पाण्यात जातो. यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. याकडे लक्ष देऊन ही समस्या मार्गी लागावी, अशी मागणी फेडरेशन ऑफ घरकुलचे अध्यक्ष सुधाकर धुरी यांनी केली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने आर्थिक दुर्बल घटकातील लोकांसाठी चिखली येथे गृहप्रकल्प उभारला आहे. यात 6 हजार 720 सदनिका आहेत. परंतू, या नागरिकांना पावसाळ्यात विविध समस्यांना सामोरे जावे लागते.

चिखली येथील घरकुल वसाहत थोड्या सखल भागामध्ये असल्याने पावसाळ्यात सोसाट्यांच्या तळमजल्यावर पाणी साचते. पावसाळ्यात पाणी तुबुंन पार्किंगमध्ये साचून राहते. त्यामुळे वीज जाते. पिण्याचे पाणीही मिळत नाही. गेल्या सात वर्षांपासूनची ही समस्या आहे.

मात्र, याकडे कोणीही लक्ष देत नाही. साचलेले सर्व पाणी जमिनी खालील पाण्याच्या टाक्यांमध्ये जाते. तसेच लिप्टचा खालील भाग पाण्याने तुडूंब भरतो. त्यामुळे लिप्ट बंद पडतात. त्याचा आर्थिक भार सोसायटींना सोसावा लागतो.

लहान मुले, वयोवृद्ध ,अपंग या नागरिकांना आठ-आठ दिवस घराबाहेर पडता येत नाही. त्यामुळे महापालिका प्रशासन, लोकप्रतिनीधींनी या समस्येकडे गांभीर्याने बघावे. ही समस्या मार्गी लावावी, अशी मागणी धुरी यांनी केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.