Chikhali News : कोरोना काळातील मिळकत कर रद्द करा : नेताजी काशीद

एमपीसीन्यूज : गेले वर्षभर सर्व जनता कोरोनाचा धैर्याने याचा सामना करत आहे. मार्च 2020 पासून सुरु असलेले संकट सध्या पुन्हा गडद होऊन लागले आहे. अजूनही परिस्थिती आटोक्यात आलेली नाही. या काळात अनेक नागरिकांना आपल्या नोकऱ्या व काम धंद्यापासून मुकावे लागले. अनेक नागरिक विस्थापित झाले. अनेकांच्या उपजीविका गेल्या. काहींनी आपल्या आप्तेष्टांना गमावले. त्यामुळे कोरोना कालावधीतील मिळकत कर माफ करुन शहरातील करदात्या नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी शिवसेना उपशहरप्रमुख नेताजी काशीद यांनी केली आहे.

या संदर्भात काशीद यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, कोरोना महामारीने प्रत्येकाचे आयुष्य बिकट अवस्थेत आणून सोडले आहे. काही घरमालकांनी आपल्या भाडेकरूंना भाडे माफी, सवलत, तसेच सेवाभावी संस्था व संघटनांनी अन्नधान्य वाटप करून एकमेकांना आधार देण्याचा स्तुत्य उपक्रम कोरून संकटात राबविला होता.

कोरोना काळात सगळ्या यंत्रणा आणि कामधंदे बंद असल्याने नागरिक घरी बसून होते. त्यामुळे अशा काळातील मिळकत कर आकारणी करणे म्हणजे एक प्रकारे जनतेवर अन्याय आहे. एरव्ही नागरिक दरवर्षी मिळकत कर स्वेच्छेने अदा करत असतात.

परंतु, यंदाची परिस्थिती तशी राहिलेली नाही.त्यामुळे जनतेला दिलासा देण्याच्या उद्देशाने विशेष बाब राज्य शासनाला सद्य परिस्थितीची जाणीव करून देत मिळकत कर माफीसाठी मंजुरी घ्यावी. कोरोना कालावधीत आकारण्यात आलेला मिळकत कर रद्द करावा, अशी मागणी काशीद यांनी निवेदनात केली आहे.

अनेक खोल्या रिकाम्या पडून

कोरोना महामारीने अनेक कामगार विस्थापित झाले. त्यांना शहर सोडून आपल्या मूळ गावी जावे लागले. त्यामुळे अनेक खोल्या रिकाम्या पडून आहेत. चिखली-मोरेवस्ती येथील प्रत्येक सोसायटीत ‘सिंगल रूम, डबल रूम भाड्याने मिळेल’, असे फलक पाहायला मिळतात. अशीच परिस्थिती संपूर्ण शहरात आहे. त्यामुळे हजारो नागरिक शहरातून विस्थापित झाले असल्याचे दिसून येते. असे असताना घर मालकांना मिळकत कर भरणे शक्य नाही. त्यासाठी यंदा मिळकत कर माफीची योजना राबविणे गरजेचे असल्याचे नेताजी काशीद यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.