Chikhali : अतिक्रमण कारवाईमुळे अल्पवयीन मुलाची आत्महत्या; मृत मुलाच्या कुटुंबीयांचा आरोप

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने विनापास भाजी विक्री करणाऱ्या एका भाजीच्या हातगाडीवर दोनवेळा कारवाई केली. त्यामुळे भाजी विक्री करणाऱ्या मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली, असा खळबळजनक आरोप आत्महत्या केलेल्या मुलाच्या कुटुंबीयांनी केला आहे.

योगेश वैजनाथ म्हेत्रे (वय 17, रा. घरकुल, चिखली) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.

योगेशच्या पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेशचे वडील सुरक्षा रक्षक असून त्याचा भाऊ एका खासगी कंपनीत काम करतो. तर योगेश आणि त्याची आई भाजीविक्रीचा व्यवसाय करतात. घरासाठी त्यांनी कर्ज घेतले होते.

लॉकडाऊनपूर्वी सर्वकाही व्यवस्थित चालले होते. मात्र, लॉकडाऊन सुरु झाल्यापासून योगेशचे वडील आणि भावाचे काम थांबले. त्यामुळे घराची जबाबदारी योगेश आणि त्याच्या आईवर आली.

ते दररोज पहाटे भाजी आणत आणि ती परिसरात विकत होते. मात्र, लॉकडाऊनच्या काळात भाजीविक्री करण्यासाठी प्रशासनाकडून पास घेणे बंधनकारक करण्यात आले. याबाबत योगेशला माहिती मिळाली नाही. दरम्यान, महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने दोनवेळा योगेशच्या हातगाडीवर कारवाई केली.

कारवाईत पहिल्यांदा हातगाडी नेली. तर दुसऱ्यांदा वजनकाटा नेला. या नैराश्यातून योगेशने सोमवारी (दि. 11) सायंकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे योगेशच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे.

याबाबत महापालिकेचे कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे म्हणाले, “कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठांच्या सूचनेनुसार पास न काढता चुकीच्या पद्धतीने भाजी विक्री करणाऱ्यांवर महापालिकेकडून कारवाई केली जात आहे. यात आमची काहीही चूक नाही.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.