Chinchwad : संचारबंदीच्या काळात दारू विकणार्‍या 30 जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – संपूर्ण देशात संचारबंदी असताना बेकायदेशीररित्या दारू विक्री करणाऱ्या 30 जणांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. त्यांच्याकडून सहा लाख 78 हजार 285 रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

सहाय्यक पोलीस आयुक्त आर.  आर.  पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड  शहराच्या सीमारेषेवर एकूण 13 ठिकाणी चेक नाके उभारण्यात आले आहे. सर्व चेक नाक्यावर 24 तास खडा पहारा असून पिंपरी-चिंचवड शहरात बाहेरून येणाऱ्या व शहरातून बाहेर जाणाऱ्या लोकांना योग्य त्या सूचना देण्यात येत आहेत.

ज्या व्यक्तींना होम क्वारंटाईन सांगितले आहे, अशा व्यक्तींच्या फिरण्यावर पायबंद घालण्यात येत आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये आणि नाकाबंदी पॉइंट लावण्यात आले आहेत. याद्वारे शहरात विनाकारण फिरणाऱ्या टवाळखोर तसेच होम क्वारंटाईन असलेल्या मात्र विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर भारतीय दंड विधान कलम 188 नुसार कारवाई केली जात आहे. आजपर्यंत 569 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहर परिसरात आठ रुग्णालयांमध्ये पोलिसांच्या कोरोना टीम कार्यरत आहेत. याच कालावधीत अवैध दारू विक्री करणार्‍यांवर देखील कारवाई केली जात आहे. संचारबंदी लागू झाल्यापासून आजपर्यंत 30 जणांवर बेकायदेशीररित्या दारूविक्री केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून सहा लाख 78 हजार 285 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.