Chinchwad : पुणेकर ज्वेलर्स दरोडा प्रकरणातील फरार आरोपीचा एन्काउंटर

एमपीसी न्यूज – रहाटणीमधील पुणेकर ज्वेलर्स या सराफी दुकानावर दरोडा टाकून 90 लाख 15 हजार रुपयांचे तीन किलो सोने सहा जणांनी पळवले. यामध्ये पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तर अन्य चारजण फरार होते. फरार असलेल्या चारपैकी एकाचा मुजफ्फरपूर येथे एन्काउंटर करण्यात आला.

रवींद्र उर्फ कालिया गोस्वामी (वय २८, रा. आदमपूर, जि. हिसार) असे एन्काउंटर झालेल्या आरोपीचे नाव आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सुभाष मोहनलाल बिशनोई (वय 24, रा. मंगाली मोहबत, हरियाणा) आणि महिपाल दुधाराम जाट (वय 21, रा. बालेवाडी, पुणे) अशी अटक केल्याची नावे आहेत. अन्य तिघेजण फरार होते. त्यांचा पोलीस शोध घेत होते. याप्रकरणी पुणेकर ज्वेलर्सचे मालक दिव्यांग प्रदीप मेहता (वय 25, रा. रायगड कॉलनीजवळ, लिंकरोड रहाटणी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

  • रहाटणी पुणेकर ज्वेलर्स दरोडा प्रकरण:
    6 मार्च 2019 रोजी शिवराजनगर, रहाटणी येथील पुणेकर ज्वेलर्स दुकानावर दरोडा टाकण्यासाठी महिपाल याने अगोदर पहाणी केली. त्यासाठी लागणाऱ्या साहित्याचीही त्यांनी जुळवाजुळव केली. या दोघांसह आणखी चारजण होते. सहा जणांनी या दुकानावर दरोडा टाकण्याची तयारी केली. दरोडा टाकण्यासाठी आरोपींनी दिवाळीच्या दरम्यान हिंजवडी येथून पल्सर दुचाकी आणि एक शाईन दुचाकी चोरली. पाच जणांनी ठरल्याप्रमाणे पुणेकर ज्वेलर्स दुकानावर दरोडा टाकला.

दरोडा टाकत असताना दुकानात दुकानाचे मालक दिव्यांग मेहता होते. आरोपींनी त्यांच्यावर गोळीबार करून दरोडा टाकला. यामध्ये दिव्यांग यांच्या पायाला गोळी लागली. आरोपींनी दिव्यांग आणि दुकानातील कामगार महिलेचा मोबाईल फोन फोडला. दुकानातील सीसीटीव्हीचा डीव्हीआर काढून चोरून नेला. दुकानातून ९० लाख १5 हजार रुपयांचे तीन किलो सोने चोरट्यांनी चोरून नेले.

  • गोळीबार आणि दरोडा प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी चार तपास पथके तयार केली. आजूबाजूच्या दुकानातील सीसीटीव्हीचे फुटेज तपासण्यात आले. त्यावेळी पल्सर मोटारसायकलवरून येऊन आरोपींनी अगोदर दुकानाची पाहणी केल्याचे समोर आले. त्यातील एकाची ओळख पटली. पोलिसांनी ओळख पटलेल्या आरोपीच्या शोधात एक तपास पथक हरियाणा येथे पाठवले. हरियाणा मधून सुभाष बिष्णोई याला अटक केली. त्यांच्याकडून २५ लाख रुपये किमतीचे पाऊण किलो सोन्याचे दागिने, दोन पिस्तूल आणि दुचाकी जप्त केली.

अटक केलेल्या आरोपींकडे चौकशी करताना त्यांनी अनिल उर्फ छोटू हनुमान दयाल बिश्नोई (रा. मंगाली सुरतीया, जि. हिस्सार), रवींद्र उर्फ कालिया गोस्वामी, सचिन उर्फ अक्षय, अनुप दावा, संदीप (रा. हिस्सार) व अन्य दोन साथीदारांसोबत हा गुन्हा केल्याचे सांगितले. वाकड पोलिसांनी हरियाणापर्यंत आरोपींचा शोध घेतला मात्र, आरोपी मिळून आले नाहीत.

  • रवींद्र ऊर्फ कालिया गोस्वामी आणि त्याचा साथीदार अमित ऊर्फ शेरू हे दोघेजण (उत्तरप्रदेश) मेरठ येथील दौराला सरधना रोडवर पोलीस चकमकीत ठार झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.