Pimpri: भाजप प्रदेशाध्यांच्या नव्या नियुक्तीमुळे शहरातील समीकरणे बदलणार

चिंचवड आणि भोसरी विभानसभा मतदारसंघाचे उमेदवार ठरविण्यात त्यांची भूमिका निर्णायक असणार

(गणेश यादव)

एमपीसी न्यूज – आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने कट्टर पवार विरोधक समजले जाणारे आणि घराणेशाहीवर जबरदस्त तडाखा लावणा-या चंद्रकांत पाटील यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे. त्यांच्या रुपाने भाजपला प्रबळ संघटक मिळाला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील निष्ठावान कार्यकर्ते सुखावले आहेत. राज्याचे महसूलमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री त्यापाठोपाठ पुण्याचे पालकमंत्रीपद असणा-या चंद्रकांतदादांकडे अधिकार एकवटले असून आता त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद आल्याने चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार ठरविताना त्यांची भूमिका निर्णायक असणार आहे.

चंद्रकांत पाटील हे कट्टर पवार विरोधी मानले जातात. त्यांनी पवारांच्या गड मानल्या जाणा-या पश्चिम महाराष्ट्राला हादरे दिले आहेत. लोकसभा निवडणुकीत देखील पवारांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात चंद्रकांतदादा तळ टोकून होते. बारामतीतून भाजप उमेदवाराचा आता पराभव झाला असला. तरी, 2024 ला शरद पवार यांच्या कन्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या पराभवाचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

  • मंत्रीमंडळात दुस-या क्रमांकाचे मंत्री असतानाच त्यांच्याकडे पुण्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी दिली होती. आता तर थेट प्रदेशाध्यक्षपद दिले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष, देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचे निकटवर्तीय अशी पाटील यांची ओळख आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातून सलग दोनवेळा ते निवडून आले आहेत. भाजपने पश्चिम महाराष्ट्र आणि पुणे जिल्ह्यावर सर्वाधिक लक्ष केंद्रित केल्याचे त्यांच्या प्रदेशाध्यक्ष निवडीवरुन दिसून येत आहे.

विधानसभा निवडणुकीला शिवसेना-भाजपची युती निश्चित मानली जात आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपचा विद्यमान आमदार आहे. लक्ष्मण जगताप आमदार असून शहराध्यक्षपद देखील त्यांच्याकडेच आहे. विधानसभेला त्यांच्यासह आणखीन काहीजण भाजपकडून लढण्यास इच्छूक आहेत. तर, भोसरी मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे हे भाजपचे सहयोगी सदस्य आहेत.

  • भोसरीतून देखील महापालिकेचे सभागृह नेते एकनाथ पवार तीव्र इच्छूक आहेत. त्यामुळे विद्यमान आमदारांना संधी द्यायची की नवीन चेह-यांना उमेदवारी द्यायची? याचा निर्णय घेताना प्रदेशाध्यक्ष असलेल्या पालकमंत्री पाटील यांची कसोटी लागणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.