Chinchwad : आदित्य बिर्ला हॅास्पिटल आरोग्य कर्मचाऱ्यांचे पुन्हा आंदोलन; कोरोनासह इतर रुग्णांचे हाल

सलग तिसऱ्या दिवशी आंदोलन सुरूच : Aditya Birla Hospital health workers' agitation again; affecting other patients including Corona

एमपीसी न्यूज – थेरगाव येथील आदित्य बिर्ला हॉस्पिटलच्या स्टाफनर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांनी सलग तिसऱ्या दिवशी संप करत हॉस्पिटल समोर आंदोलन केले. हॉस्पिटल व्यवस्थापन कर्मचाऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे. उलट राजीनामा दिला तरी काही हरकत नाही, अशी भाषा वापरात असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. सलग तीन दिवसाच्या आंदोलनामुळे हॉस्पिटलमधील कोरोनासह इतर रुग्णांचे हाल होत आहेत.

आदित्य बिर्ला रुग्णालय प्रशासनाकडून मानसिक त्रास दिला जात असल्याचा गंभीर आरोप करत रुग्णालयातील आरोग्यसेविका व सेवकांनी गुरुवारी (दि.6) रुग्णालयाबाहेर भर पावसात आंदोलन केले होते.

मात्र, बिर्ला हॉस्पिटल प्रशासन त्यांच्या मागण्याची काहीच दखल घेत नसल्यामुळे या कर्मचाऱ्यांनी
आज (दि.8) पुन्हा हॉस्पिटल समोर आंदोलन केले. आम्ही काम करण्यासाठी तयार आहोत, मात्र आमच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी आंदोलक कर्मचाऱ्यांनी केली आहे.

अतिदक्षता विभागातील एका कोरोना रुग्णाच्या सेवेसाठी एकच आरोग्य सेवक असा नियम असताना बिर्ला रुग्णालयात 10 कोरोना रुग्णांसाठी 1 सेवक दिला जात आहे. त्यामुळे प्रचंड तणाव येत असल्याचे आरोग्य कर्मचारी सांगतात.

सहा तासाची शिफ्ट असताना सलग बारा तासाची रात्र पाळी लावली जाते. तसेच सलग सहा ते सात दिवस काम करण्याची सक्ती केली जात आहे. सलग काम करत असल्यामुळे प्रचंड मानसिक ताण येत असून विश्रांतीला वेळ मिळत नसल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.

कामावर हजर राहण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांवर दबाव आणला जात आहे व धमकीवजा दमदाटी केली जात आहे. तसेच, निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असल्याचे या कर्मचाऱ्यांनी सांगितले.

कर्मचाऱ्यांची कमतरता भरून काढण्यासाठी बिर्ला व्यवस्थापनाने रुग्णालयातील मामा, मावशी यांना नर्सिंगचा पोशाख घालून रुग्णाच्या सेवेसाठी उभे करत असल्याचा गंभीर आरोप या कर्मचाऱ्यांनी केला आहे.

दरम्यान, सलग तीन दिवस आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संपामुळे रुग्णालयातील कोरोना रुग्णासह इतर रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. लवकरच कर्मचारी भरती करणार असल्याचे सांगून हॉस्पिटल व्यवस्थापन आमच्या मागण्या टाळत असल्याचे आरोग्य कर्मचाऱी सांगतात.

दरम्यान, याप्रकरणी आम्ही बिर्ला रुग्णालयांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.