Chinchwad Bye Election : भाजप, राष्ट्रवादीचा ढोंगीपणा जनतेने ओळखला – राहुल कलाटे

एमपीसी न्यूज –  अनधिकृत बांधकामे नियमित करणे, शास्तीकर माफी हे प्रश्न तत्कालीन काँग्रेस -राष्ट्रवादी आघाडी सरकार व भाजपने प्रलंबित ठेवले. निवडणुका आल्या की घोषणांवर घोषणांचा पाऊस पाडला जात आहे. दोनही पक्षाचा ढोंगीपणा लोकांनी (Chinchwad Bye Election) ओळखला आहे. त्यामुळे या निवडणुकीत मतदार भाजप-राष्ट्रवादीला धडा शिकवतील, असा विश्वास अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी व्यक्त केला.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत अपक्ष म्हणून शिट्टी या चिन्हावर निवडणूक रिंगणात उतरलेल्या कलाटे यांनी  प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजप व राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, गेल्या चार दिवसात  महाविकास आघाडी आणि भाजपच्या नेत्यांनी शहरात प्रचारासाठी येऊन घोषणांचा पाऊस पाडला आहे. 24 तास पाणी, निगडी ते पिंपरी मेट्रो , ट्रान्सपोर्टेशन रस्ते, अनधिकृत बांधकामे नियमित करू, शास्तीकर माफ करू अशा अनेक घोषणांचा समावेश आहे.

 

 

Talegaon Dabhade News : मावळातील लेण्यांचा वारसा जपण्याची गरज – सत्यजीत खांडगे

वास्तविक मागे राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार होते. त्यांच्याच कार्यकाळात अनधिकृत बांधकामांवर शास्ती कर लादला गेला. त्यावेळी पिंपरी- चिंचवड मधील दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप, अण्णा बनसोडे व विलास लांडे हे या शहराचे प्रतिनिधित्व करत होते. मात्र त्यावेळी विधानसभेत यातील एकानेही शास्तीकरास विरोध केला नाही. त्यामुळे शास्तीकराचे हे भूत उतरवण्यासाठी जनतेला संघर्ष करावा लागत आहे.

काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार सत्तेवर असताना अनधिकृत बांधकामे नियमित करावीत तसेच शास्तीकर माफ करावा यासाठी मुंबई व नागपूर अधिवेशनात जे मोर्चे काढण्यात आले त्यात माझा पुढाकार व महत्त्वपूर्ण सहभाग होता. भाजपची सत्ता येवूनही अनधिकृत बांधकामे व शास्ती कराचा प्रश्न सुटलेला नाही. दिवंगत आमदार जगताप यांच्या निधनानंतर होत असलेल्या या पोटनिवडणुकीत हा प्रश्न सोडविण्याची घोषणा भाजप करत आहे हे खरे तर हास्यास्पद आहे. भाजपने स्वच्छ कारभाराचे वचन देऊन पालिकेत सत्ता मिळवली. मात्र  पदाधिकारी (Chinchwad Bye Election) पोसून टक्केवारी गोळा करण्यात भाजपला रस होता.

गेल्या पाच वर्षात टेंडरवरच अधिक खर्च झाला .मूलभूत सोयी सुविधा पुरविण्यात महापालिकेतील सत्ताधारी भाजपला अपयश आले. शहरवासीयांना 24 तास पाणी देण्याची घोषणा केली गेली .मात्र दिवसाआड पाणी तेही अनेक भागात कमी दाबाने मिळत आहे. टँकर लॉबी जोरात आहे. भामा आसखेड व आंद्रा धरणातून पाणी आणण्याच्या योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही कलाटे यांनी केला.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.