Chinchwad News : पोलिसांच्या परवानगीशिवाय नवीन एटीएम सुरू करू नका : पोलीस आयुक्त

एमपीसी न्यूज – पोलिसांच्या परवानगीशिवाय नवीन एटीएम सुरू करू नका, अशा सूचना पोलिसांकडून शहरातील बँकांना देण्यात येणार आहेत. एटीएमची देखभाल आणि सुरक्षेसाठी बँकांकडून एखाद्या संस्थेची नेमणूक करण्यात येते. मात्र, संबंधितांच्या हलगर्जीपणामुळे एटीएम फोडण्याच्या घटना घडतात. हरियाणामधील एका टोळीने पांजरपोळ येथील एसबीआय बँकेचे एटीएम फोडले. त्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी ही माहिती दिली आहे.

10 जून रोजी मध्यरात्री चोरट्यांनी पांजरपोळ येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे (एसबीआय) एटीएम फोडून नेले. यामध्ये चोरट्यांनी पैशांच्या चार ट्रे सह 22 लाख 95 हजार 600 रुपयांची रोकड चोरून नेली. एटीएमची देखभाल आणि सुरक्षा व्यवस्था पुरवणा-या संबंधित संस्थेच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडला असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले. त्यामुळे त्या संबंधितांना देखील या प्रकरणात सहआरोपी केले जाणार आहे.

तसेच बँकांनी नवीन एटीएम सुरू करण्यापूर्वी पोलिसांची परवानगी घ्यावी. सुरक्षेचे मापदंड पाळून एटीएम सुरू करावे. एटीएमच्या सुरक्षेची जबाबदारी निश्चित कारावी आणि त्याबाबत सजग राहावे. एटीएममध्ये सायरन आणि अन्य तांत्रिक बाबींचा समावेश करावा. ते चालू स्थितीत असल्याचे वारंवार तपासायला हवे.

पोलीस रात्रीच्या वेळी गस्त घालताना देखील एटीएमवर लक्ष ठेवतात. चिखली येथे पोलिसांनी रात्री लक्ष ठेवल्यामुळे एक एटीएम फोडीचा प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे बँकांनी पोलिसांना एटीएमची माहिती तर घ्यावीच परंतु नवीन एटीएम सुरू करताना पोलिसांची परवानगी अवश्य घ्यावी.

बँकांनी नवीन एटीएम सुरू करताना त्याची पोलिसांकडून परवानगी घ्यावी. याबाबत पोलिसांकडून शहरातील बँकांना सांगण्यात येणार आहे, असेही आयुक्तांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.