Chinchwad Crime News : फेब्रुवारी महिन्यात दर चार दिवसाला एक खून

एमपीसी न्यूज – फेब्रुवारी महिन्यात पिंपरी-चिंचवड शहरात आठ खून झाले आहेत. हे सरासरी प्रमाण चार दिवसांहून कमी आहे. मागील वर्षी दर पाच दिवसाला एक खुनाची घटना घडल्याचे आकडेवारी सांगते. मात्र यावर्षी ही आकडेवारी वाढत आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यातील आठ पैकी तीन खुनाच्या घटना अजूनही गुलदस्त्यातच आहेत. त्यात पोलीस अजूनही आरोपींपर्यंत पोहोचू शकलेले नाहीत.

जानेवारी महिन्यात खुनाच्या दोन घटना घडल्या. त्या दोन्ही खुनाच्या गुन्ह्यांचा तपास करण्यास पोलिसांना यश आले आहे. मात्र फेब्रुवारी महिन्यात खुनाच्या गुन्ह्यात अचानक वाढ झाली. फेब्रुवारी महिन्यात आठ खून झाले असून त्यातील केवळ पाच गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले. उर्वरित तीन गुन्ह्यातील आरोपी अजूनही मोकाट आहेत.

हिंजवडी येथे शाब्दिक वादातून तिघा पिता-पुत्रांनी मिळून मुंबई येथील एका व्यक्तीचा खून केला. हिंजवडी पोलिसांनी तिघांना अटक केली आणि गुन्हा उघडकीस आणला.

त्यानंतर पिंपरी येथील चिटफंड व्यावसायिक आनंद उनावणे यांचे अपहरण करून त्यांचा खून करण्यात आला. ही घटना 6 फेब्रुवारी रोजी उघडकीस आली. उनावणे यांचा मृतदेह महाड येथे एका नदीच्या पात्रात आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी सूत्रे हलवून आरोपींना बेड्या ठोकल्या.

तळवडे येथे आईला मारहाण करून शिवीगाळ केल्याच्या तसेच जमिनीच्या वादातून एका तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृणपणे खून केल्याची घटना 12 फेब्रुवारी रोजी घडली. त्यात गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांनी दोघांना अटक केली आणि देहूरोड पोलीस ठाण्यात दाखल असलेला हा गुन्हा उघडकीस आणला.

कोरोना काळात तात्पुरत्या जामिनावर कारागृहातून बाहेर आलेल्या आरोपीचा इंद्रायणी घाटावर आळंदी येथे खून केल्याची घटना 23 फेब्रुवारी रोजी उघडकीस आली. रात्रीच्या वेळी घाटावर फिरत असताना काही जणांनी खून झालेल्या व्यक्तीला अडवले. त्याच्याकडील ऐवज चोरण्याच्या वादात तिघांनी त्याला दगडाने ठेचले आणि आरोपी निघून गेले. त्यानंतर पोलिसांनी त्यातील दोघांना अटक केली आणि गुन्हा उघडकीस आणला.

एमआयडीसी भोसरी परिसरात 24 फेब्रुवारी रोजी एक व्यक्ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. गळफास घेतलेल्या अवस्थेवरून त्याने आत्महत्या केली कि त्याची हत्या करण्यात आली हे मात्र समजू शकलेले नाही. गहुंजे येथे 8 मार्च रोजी एकाचा दगडाने ठेचून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला. गहुंजे स्टेडियमच्या बाजूला हा मृतदेह आढळला.

त्यानंतर 11 मार्च रोजी वाल्हेकरवाडी येथे एका शेतात तरुणाचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. या तिन गुन्ह्यांचा तपास करण्यात पोलिसांना अजून यश आलेले नाही.

फेब्रुवारी महिन्यातील दाखल गुन्हे (उघड गुन्हे)

खून – 8 (5)

_MPC_DIR_MPU_II

खुनाचा प्रयत्न – 12 (11)

सदोष मनुष्यवध – 1 (1)

बलात्कार – 18 (18)

दरोडा – 6 (6)

जबरी चोरी – 26 (14)

घरफोडी – 27 (8)

वाहन चोरी – 96 (6)

दंगा – 14 (14)

फसवणूक – 37 (29)

सरकारी नोकरावरील हल्ले – 15 (14)

प्राणांतिक अपघात – 26 (19)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.