Pimpri News: विद्यार्थी हे उद्याचे भविष्य, त्यांच्या या असंतोषाला राज्य सरकार जबाबदार – अमित गोरखे

एमपीसी न्यूज – राज्यसेवेची पूर्वपरीक्षा पुढे ढकलून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्याचा प्रयत्न केला आहे. विद्यार्थी हे उद्याचे भविष्य, त्यांच्या या असंतोषाला राज्य सरकार जबाबदार असेल असा आरोप भाजपचे प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी केला आहे. दरम्यान, सरकारने राज्यसेवा पूर्वपरीक्षेची नवीन तारीख आज (शुक्रवारी) जाहीर केली असून आता 21 मार्चला परीक्षा होणार आहे.

गोरखे यांनी म्हटले आहे की, राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर या महिन्यात होणारी एमपीएससीकडून घेण्यात येणारी नियोजित राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. ही परीक्षा 14 मार्च रोजी होणार होती. ही परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अचानक पुढे ढकलल्यामुळे आमदार गोपीचंद पडळकर यांनी गुरुवारी पुण्यात आंदोलन सुरु केले होते.

पुण्यासह नागपूर, कोल्हापूर, जळगाव, औरंगाबाद, नांदेड, नाशिक, अहमदनगर येथे विध्यार्थ्यांचे जोरदार आंदोलन चालू आहे. एमपीएससीचे शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. पुणे शहरातील नवी पेठेमध्ये मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून विद्यार्थ्यांनी रास्तारोको आंदोलन केले. आहे.

गोरखे म्हणाले, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा पूर्व परीक्षा दिनांक 14 मार्च रोजी होणार होती. या परीक्षेला केवळ तीन दिवस उरलेले असताना ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयामुले प्रशासकीय सेवेत जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य उध्वस्त झाले आहे. एमपीएससी परीक्षेसाठी वर्षानुवर्षे तयारी करणारे लाखो विद्यार्थी-विद्यार्थिनी या निर्णयामुळे संतप्त झाले.

सगळेच विद्यार्थी एकाच प्रयत्नात परीक्षा पास होतात असे नाही. अनेक विद्यार्थ्यांचा दुसरा आणि तिसरा प्रयत्न असतो. त्यांचे परीक्षेला बसण्याचे वय निघून जाऊ शकते. 14 तारखेच्या परीक्षा घ्यायलाच पाहिजेत. परीक्षा 3 दिवसांवर असताना सरकार अचानक असे निर्णय घेऊ शकत नाही, असे देखील गोरखे म्हणाले आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.