Chinchwad : दिवाळीनिमित्त गावी जाण्यासाठी रेल्वेचे वेटिंग अन बस स्थानकावर गर्दी

एमपीसी न्यूज – शहरात रोजीरोटीसाठी (Chinchwad) आलेले चाकरमानी दिवाळीनिमित्त गावी जाण्याची तयारी करू लागले आहेत. या तयारीत गावी जाण्यासाठी रेल्वेचे तिकीट वेटिंगवर असल्याने अनेकांनी बस स्थानकात धाव घेत आगाऊ तिकीट बुकिंग करण्यावर भर दिला आहे. यामुळे बस स्थानकांवर गर्दी पहायला मिळत आहे.

पिंपरी-चिंचवड ही कामगारांची नगरी आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून शहरात कामासाठी चाकरमानी आले आहेत. कामासह शिक्षण, व्यवसाय यासाठी देखील अनेकजण शहरात आले आहेत. त्यातच मुलांच्या पहिल्या सत्रातल्या परीक्षा अंतिम टप्प्यात असून काही शाळांच्या परीक्षा संपल्या आहेत. त्यामुळे बच्चे कंपनी देखील दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी सज्ज झाली आहे.

पिंपरी-चिंचवड येथून दिवाळीनिमित्त वेगवेगळ्या मार्गांवर 77 जादा बस गाड्या सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी एसटी महामंडळाचे नियोजन सुरु आहे. ऑनलाईन बुकिंगसह एसटी स्थानकावर देखील बुकिंगची सुविधा सुरु केली आहे. त्यामुळे अनेकांनी एसटी स्थानकात जाऊन तिकीट बुक करण्यावर भर दिला आहे. वल्लभनगर आगारात नागरिक तिकीट बुकिंगसाठी गर्दी करू लागले आहेत.

Kudalwadi : पायी जाणाऱ्या नागरिकाचा टेम्पोच्या धडकेत मृत्यू

रेल्वेचे वेटिंग

रेल्वेचा प्रवास अनेकांना सुखावणारा वाटतो. लांब पल्ल्याचा प्रवास रेल्वेने करण्यास अनेकजण पसंती देतात. दिवाळी हा (Chinchwad) वर्षातील सर्वात मोठा सण असल्याने सर्वचजण काही महिने अगोदरच तिकीट बुक करतात. त्यामुळे ऐन सणाच्या तोंडावर तिकीट मिळेनासे होते. यावर्षी देखील हीच परिस्थिती आहे. रेल्वेने अनेक मार्गांवर ज्यादा गाड्या सोडल्या असल्या तरीही बहुतांश गाड्यांना वेटिंग आहे.

वाट पाहीन पण एसटीनेच जाईन

वल्लभनगर आगारातून सुटणाऱ्या बसचे तिकीट मिळाले नाही तर नागरिक शिवाजीनगर, स्वारगेट येथे जाऊन तिकीट बुक करीत आहेत. महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरात 50 टक्के सवलत आहे. तसेच 75 वर्षांवरील महिलांना एसटीच्या तिकीट दरात 100 टक्के सवलत आहे. त्यामुळे अनेकांनी वाट पाहीन पण एसटीनेच जाईन, असा पवित्रा घेतला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.