Chinchwad : ‘याचि देही, याचि डोळा’ भक्‍तांनी अनुभवला; दोन्ही पालखी भेटीचा अभूतपूर्व सोहळा

एमपीसी न्यूज – जगद‍्गुरू संत तुकाराम महाराज यांची आषाढी वारीसाठी पंढरपूरला गेलेली पालखी पंढरपूरहून देहूकडे परतत असताना चिंचवडगावात रविवारी (दि.28) सकाळी एक तासभर विसावली. यावेळी श्रीमन महासाधू मोरया गोसावी आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीच्या अभूतपूर्व भेटीचा सोहळा भक्‍तगणांनी ‘याचि देही, याचि डोळा’ अनुभवला.

संत तुकोबांच्या पालखीचा परतीचा प्रवास चिंचवडगावातून व्हावा, अशी मागणी भाविकांकडून सातत्याने होत होती ती पूर्ण झाली. पालखीचे हे चिंचवडमधील दुसरे वर्ष होते. त्यामुळे तुकोेबांची पालखी चिंचवडगावात दाखल झाली. त्यावेळी भक्तगणांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यंदा या पालखीने चिंचवडगावात पाहुणचार घेतला. टाळ-मृदंगाच्या गजरात, तसेच ‘मोरया मोरया’ आणि तुकोबा- ज्ञानोबाच्या जयघोषात चिंचवडकरांनी पालखीचे स्वागत केले.

  • यावेळी हजारो भाविकांनी मनोभावे पालखीचे दर्शन घेतले. पालखी सोहळा प्रमुख संजय मोरे, चिंचवड देवस्थानचे मंदार देव महाराज, उपमहापौर सचिन चिंचवडे, नगरसेवक सुरेश भोईऱ, गजानन चिंचवडे, नगरसेवक राजेंद्र गावडे, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, नगरसेविका अपर्णा डोके, अंबर चिंचवडे, आदेश चिंचवडे, मदन भोईऱ, नगरसेविका करुणा चिंचवडे, नगरसेवक नामदेव ढाके, नगरसेवक शीतल शिंदे, माजी नगरसेवक मधुकर चिंचवडे, माजी नगरसेवक शामराव वाल्हेकर, विलास भोईर, सखाराम नखाते, चिंचवड देवस्थानचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव, विश्राम देव, विश्वस्त आनंद महाराज मोरे,गजानन महाराज मंदिरचे विश्वस्त विश्वनाथ दनवे, किशोर कदम, सखाराम नखाते आदी उपस्थित होते.

संपूर्ण चिंचवडगाव महासाधू मोरया गोसावी व ज्ञानोबा-तुकोबा यांचा जयघोषाने भक्‍तिमय झाले होते. यावेळी मंदार देव महाराज यांच्या हस्ते तुकाराम महाराज यांची आरती करण्यात आली. पालखी सोहळाप्रमुख संजय मोरे यांचा मंदार देव महाराजांच्या हस्ते सत्कार झाला. या अभूतपूर्व पालखीभेट सोहळ्यानंतर भक्‍तीपूर्ण वातावरणात तुकोबांची पालखी देहूकडे मार्गस्थ झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.