Chinchwad : कर्जाला कंटाळलेले व्यावसायिक कुटुंब बेपत्ता

एमपीसी न्यूज – व्यवसाय करण्यासाठी कर्ज घेतले. ते मुदतीत फेडता आले नाही. त्यामुळे कर्जाला कंटाळून एक व्यावसायिक कुटुंब राहत्या घरातून निघून गेले. ही घटना 5 डिसेंबर रोजी मोहननगर येथे घडली.

संतोष एकनाथ शिंदे (वय 47), पत्नी सविता संतोष शिंदे (वय 41), मुलगा मुकुंद शिंदे (वय 22), मैथली शिंदे (वय 18, सर्व रा. क्रांती ज्योती शाळेजवळ, मोहननगर, चिंचवड) अशी बेपत्ता झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी नितीन एकनाथ शिंदे (वय 38) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. त्यांच्या एकूण दहा गाड्या व्यवसायात आहेत. शिंदे यांचे एकत्र कुटुंब होते. त्यांनी व्यवसाय व इतर कामांसाठी विविध ठिकाणाहून सुमारे दोन कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यांनी मागील काही दिवसांपासून खासगी पतसंस्था आणि अन्य कर्जदारांचे पैसे परत मागण्यासाठी फोन येत होते. वेळेत कर्ज फेडता येत नसल्याने ते मागील काही दिवसांपासून अस्वस्थ होते. शिवाय त्यांनी राहत्या घरावर कर्ज काढण्याचा मानस देखील त्यांच्या नातेवाईकांना बोलून दाखवला.

5 डिसेंबर रोजी संतोष शिंदे त्यांच्या पत्नी आणि दोन मुलांसह घरातून निघाले. त्यावेळी त्यांच्या लहान भावाने त्यांना कुठे जात आहात याबाबत विचारले. त्यावर त्यांनी ‘फिरायला जातोय’ असे सांगितले. त्यांच्या ड्रायव्हरने मी सोडतो असे सांगत चिंचवड रेल्वे स्थानकाजवळ शिंदे कुटुंबियांना सोडले. त्यानंतर ते कुटुंबीय रिक्षाने बेपत्ता झाले. रात्री उशीर झाला तरी शिंदे कुटुंबीय घरी आले नाहीत. त्यामुळे घरच्यांनी शोधाशोध सुरु केली. चौघांना फोन लावण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणीही फोन उचलला नाही. अखेर घरच्यांनी एकनाथ शिंदे राहत असलेल्या खोलीचा दरवाजा उघडला. त्यावेळी त्यांना चौघांचे मोबाईल फोन मिळाले. तसेच एक चिठ्ठी सापडली. त्यामध्ये शिंदे यांनी लिहले होते की, “माझ्या साऱ्या व्यवहराचा तपशील डायरीत लिहून ठेवला आहे. मी माझा परिवार आत्महत्या करत आहोत.” चिठ्ठी शेजारीच घरातील कपाटाच्या चाव्याही ठेवल्या होत्या.

मुकुंद शिंदे हा मॅकेनिकल इंजीनिअरिंगचे शिक्षण घेत आहे. तर मुलगी मैथली इयत्ता बारावीच्या वर्गात शिकत आहे. मुकंद याची इंजिनिअरींगची परीक्षा तोंडावर आली असतानाच हे कुटुंब बेपत्ता झाले आहे. पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. अद्याप तरी पोलिसांपर्यंत कोणतीही आतम्हत्येची बातमी मिळालेली नाही. मात्र या घटनेमुळे शिंदे कुटुंबीय पूर्णपणे खचले आहे. या कुटुंबाची महिती मिळाल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.