Chinchwad: बांधकाम व्यावसायिकांकडून होणा-या ध्वनी प्रदुषणाबाबत पालिकेचे दुर्लक्ष 

शिवसेना नगरसेविकेचा आरोप 

एमपीसी न्यूज – चिंचवड स्टेशन परिसरात बांधकाम व्यावसायिकांकडून रात्री-अपरात्री काम केले जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनीप्रदुषण होत आहे. त्याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत महापालिकेकडे तीनवेळा तक्रार करुन देखील त्याची दखल घेतली जात नसल्याचा आरोप, शिवसेना नगरसेविका मीनल यादव यांनी केला आहे. तसेच रात्रीच्या वेळी चालणारे काम त्वरित थांबवावे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. 
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नगरसेविका यादव यांनी म्हटले आहे की, चिंचवड स्टेशनकडून केएसबी चौकाकडे जाणा-या रस्त्यावर एक खासगी बांधकाम सुरु आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरु आहे. हे खोदकाम जेसीबी, पोकलंडच्या सहाय्याने दिवस-रात्र सुरु आहे. याठिकाणी ब्लास्टिंग करण्यात येते. रात्रीच्या वेळेत देखील हे काम सुरु असते. यामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदुषण होत आहे. बांधकामाच्या मागे मोठ्या प्रमाणार गृहप्रकल्प आहेत. त्यातील नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
नागरिकांनी याची वारंवार तक्रार केली आहे. हे काम थांबवून व्यावसायिकावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली. त्यांना तीनवेळा पत्र पाठविले आहे. तरी, देखील महापालिकेकडून नागरिकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत बांधकाम व्यावसायिकांना अभय दिले जात आहे. रात्रीच्या वेळी चालणारे काम त्वरित थांबवावे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा नगरसेविका यादव यांनी निवेदनातून दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.