Chinchwad : बीएसएनएलने विजबिल न भरल्याने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासह अनेक ठिकाणचे इंटरनेट ठप्प

बीएसएनएल टॉवरचे बिल न भरल्यामुळे महावितरणकडून टॉवरची वीजसेवा बंद; थकीत वीजबिल ग्राहकांवर कठोर कारवाई

एमपीसी न्यूज – बीएसएनएल कंपनीकडून वीजबिल न भरल्यामुळे महावितरणकडून चिंचवड येथील बीएसएनएल टॉवरची वीजसेवा बंद करण्यात आली आहे. यामुळे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची इंटरनेट सेवा दोन दिवसांपासून ठप्प झाली आहे.

महावितरणकडून थकीत वीजबिल ग्राहकांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. त्यामध्ये बीएसएनएलचा देखील नंबर लागला आहे. चिंचवड येथील बीएसएनएल टॉवरचे वीजबिल भरण्यात आले नाही. त्यामुळे महावितरणकडून टॉवरसाठी लावण्यात आलेला वीजमीटर काढून टाकण्यात आला आहे.

बीएसएनएलचे उपविभागीय अभियंता उदय गाडेकर म्हणाले, “बीएसएनएल कंपनीकडून फंडच्या अडचणी येत आहेत. फंड न आल्यामुळे महावितरणचे वीजबिल भरता आलेले नाही. आम्ही फंडसाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करीत आहोत. बीएसएनएलचे कार्यालयीन कामकाजाचे फंडिंग दिल्ली आणि मुंबई कार्यालयातून होते. फंड येताच आम्ही वीजबिल भरणार आहोत. दोन्ही सेवा शासकीय आहेत. आम्ही महावितरणशी समन्वय साधण्याचा प्रयत्न करीत आहोत”

पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाकडून सिंगल फेज वीज कनेक्शन मिळाल्यास आयुक्तालयाची इंटरनेट सेवा सुरळीत करता येईल. त्यासाठी देखील बीएसएनएल कडून प्रयत्न सुरु असल्याचे गाडेकर यांनी सांगितले.

महावितरणचे जनसंपर्क अधिकारी निशिकांत राऊत म्हणाले, “बीएसएनएल टॉवरच्या पाच कनेक्शनची एकूण 2 लाख 47 हजार रुपये थकबाकी आहे. यातील तीन मीटरचे नोव्हेंबर 2018 पासून तर दोन मीटरचे जानेवारी 2019 पासून वीजबिल थकले आहे. त्यामुळे महावितरणकडून बीएसएनएल टॉवरचे मीटर काढून घेतले आहेत. या टॉवरवरून आयुक्तालयासह चिंचवड प्रेमलोक पार्क परिसरात इंटरनेट सुविधा पुरविली जात आहे. ती पूर्णपणे बंद आहे”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.