Chinchwad: केशवनगर भागात गॅरेजला भीषण आग, अनेक वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी

एमपीसी न्यूज – चिंचवडच्या केशवनगर भागातील एका गॅरेजला मंगळवारी रात्री 11 च्या सुमारास भीषण आग लागली असून त्यात 10 ते 12 मोटारी जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. अग्नीशमन दलाचे पाच बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

चिंचवडगावातून काळेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर केशवनगर येथील चित्तराव गणपती मंदिराजवळ असलेल्या मदिना ऑटोमोबाईल्स या गॅरेजला आग लागली व ती प्रचंड भडकली. गॅरेजमध्ये व परिसरात असलेली वाहने जळून खाक झाली. आजूबाजूला असलेली गोदामे, फर्निचरचे दुकान व अन्य दुकानांना देखील आगीची झळ पोचल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. घटनास्थळी अग्निशमन दल व पोलीस दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचे आतापर्यंत वृत्त नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.