Pimpri: शहराने गाठली पन्नाशी! पिंपरी-चिंचवड शहरनिर्मितीचा सुवर्णमहोत्सव!

खेडेगाव ते स्मार्ट सिटीचा विस्मयकारक प्रवास

एमपीसी न्यूज (विजय जगताप) – पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, भोसरी या चार ग्रामपंचायतीचे क्षेत्र एकत्र करून चार मार्च 1970 ला पिंपरी-चिंचवड या नवनगराची निर्मिती करण्यात आली, त्याला आज (बुधवारी) बरोबर 50 वर्षे पूर्ण होत आहेत. गेल्या 50 वर्षांत खेडेगाव ते अत्याधुनिक महानगर अशी या शहराने केलेली प्रगती विस्मयकारकच म्हणावी लागेल.

स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीतून पुणे शहराच्या जवळ औद्योगिक वसाहत विकसित झाली. या उद्योगांमुळे पोटापाण्यासाठी राज्यातूनच नव्हे तर देशभरातून पिंपरी, चिंचवड, भोसरी, आकुर्डी या परिसरात लोकांचे लोंढे येऊ लागले. झपाट्याने वाढणारी लोकसंख्या लक्षात घेऊन या परिसरात एक नवनगर विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला. पिंपरी-चिंचवड या औद्योगिकनगरीचे शिल्पकार म्हणून आण्णासाहेब मगर ओळखले जातात. डॉ. श्री. श्री. घारे हे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष होते.

मोठमोठ्या उद्योगांमुळे कररुपाने मिळणाऱ्या भरघोस उत्पन्नामुळे आशिया खंडातील सर्वांत श्रीमंत नगरपालिका म्हणून पिंपरी-चिंचवड नगरपालिकेने नावलौकिक मिळविला. लोकसंख्या कमी आणि नगरपालिकेचे उत्पन्न जास्त म्हणून दरडोई उत्पन्नात पिंपरी-चिंचवड नगरपालिका आशिया खंडात अव्वल ठरली होती.

शहराच्या वाढीचा वेग कित्येक पटींनी वाढल्याने अवघ्या 12 वर्षांत नगरपालिकेचे महापालिकेत रुपांतर झाले. त्यावेळी पवना नदीच्या पलिकडील भागाचाही शहरात समावेश झाला. 11 ऑक्टोबर 1982 ला पिंपरी-चिंचवड महापालिकेची स्थापना झाली. हरनाम सिंग हे महापालिकेचे पहिले आयुक्त व प्रशासक होते. 1986 च्या निवडणुकीनंतर ज्ञानेश्वर लांडगे यांना पिंपरी-चिंचवडचे पहिले महापौर होण्याचा मान मिळाला. सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख, रहाटणी, काळेवाडी, थेरगाव आणि वाकड या गावांचा त्यात समावेश झाला.

महापालिकेची 11 सप्टेंबर 1997 मध्ये पुन्हा हद्दवाढ झाली आणि तळवडे, चिखली, मोशी, डुडुळगाव, चोविसावाडी, वडमुखवाडी, चऱ्होली, दिघी, बोपखेल, दापोडी, मामुर्डी, किवळे, रावेत, पुनवळे आदी गावे पालिकेत आली. मध्येच बेटासारखे उरलेले ताथवडे गावही पुढे महापालिकेत समाविष्ट झाले.

अण्णासाहेब मगर, रामकृष्ण मोरे यांच्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार अशा राजकीय मंडळींनी शहराच्या नेतृत्वाची धुरा सांभाळलेली आहे. महापालिकेतील सत्तांतरानंतर आता आमदार लक्ष्मण जगताप व आमदार महेश लांडगे हे या शहराचे नेतृत्व करीत आहेत.

पूर्वी ‘निळे डगलेवाल्यांचे शहर’ म्हणून ओळखली जाणारी ही कामगारनगरी काळाच्या ओघात आता पूर्णपणे बदलून गेली आहे. पुण्याचे उपनगर ही ओळख पुसून काढत या शहराने स्वतःचे वेगळी ओळख निर्माण केली आहे. शहरालगत हिंजवडी येथे झालेल्या ‘आयटी हब’ शहराच्या विकासाला आणखीच गतिमान केले. औद्योगिक शहराचे रुपांतर आता निवासी शहरात होऊ लागले आहे. उद्योग-व्यापाराबरोबरच शिक्षण, कला, संस्कृती अशा सर्वच बाबतीत शहराची समृद्धी वाढत आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाची स्मार्ट सिटी होण्याच्या दिशेने शहराची वाटचाल सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.