Chinchwad News : आयुष्यातील अंधारावर मात करुन यशस्वी व्हा – कृष्णप्रकाश

'चलो किसिका सहारा बने' कार्यक्रमात पोलीस आयुक्तांचे डोळ्याला पट्टी लावून आगमन

एमपीसी न्यूज – दिव्यांग बांधवांच्या व्यथा, वेदना व गरज याचा विचार करून त्यांना सहानभूती नाही तर सहकार्य करणे महत्वाचे आहे. आपल्या अंतर मनाला जागृत करून आयुष्यात यशाची शिखरे सहज पार करता येतात. आयुष्यात आलेल्या अंधाराला न डगमगता आपण पुढे जायला हवं. मोठी स्वप्नं पाहून यशस्वी व्हायला हवं. दृष्टी नसली तरीही आपल्याकडे मोठे ध्येय गाठण्याची शक्ती आहे. अडचणींवर मात करून आपण शिक्षण, खेळ, नोकरीच्या माध्यमातून यशस्वी वाटचाल करीत आहात ही आनंदाची बाब असल्याचे गौरवोद्गार पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी काढले.

जागतिक अंध दिवसानिमित समाजातील वंचित घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ‘चलो किसिका सहारा बने’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात करण्यात आले. त्यावेळी दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

पोलीस आयुक्तांच्या दालनात हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या ठिकाणी येताना पोलीस आयुक्त यांनीही आपल्या डोळ्याला काळी पट्टी बांधून व्यासपीठावर आगमन केले.

_MPC_DIR_MPU_II

प्रेरणा असोसिएशन फॉर दि ब्लाईंड व जितो पिंपरी चिंचवड यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमासाठी प्रेरणा परिवाराचे अध्यक्ष पराग कुंकुलोळ, जितो अध्यक्ष संतोष धोका उपस्थित होते.

डोळ्यात दाटलेल्या काळ्याकुट्ट अंधारातून उद्याच्या उज्वल भविष्याची स्वप्नं पाहणाऱ्या अंध बंधवांना मार्ग दाखविणाऱ्या पांढऱ्या काठीचे वाटप आयुक्तांच्या हस्ते करण्यात आले.

आधुनिक युगात तंत्रज्ञानाचा वापर करुन अंध व्यक्ती आपले अस्तित्व कशा प्रकारे दाखवीत आहेत, याबाबत ऑनलाईन पद्धतीने प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. अंध शिक्षक व प्रशिक्षक सतीश नवले यांनी ऑनलाईनद्वारे आयुक्तांशी संपर्क साधत अंध व्यक्तींच्या शिक्षण, रोजगार व इतर कार्यक्रमाची माहिती दिली.

कार्यक्रमासाठी अंध विद्यार्थी संतोष राऊत, तुप्ती कर्णावट, पूनम बंब, सुस्मिता कन्हेरी, नेमीचंद ठोले, विश्वास काशीद, अर्चना चोरडिया, सचिन साकोरे, उमेश भंडारी, मनीष ओस्तवाल आदींनी सहकार्य केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like