Chinchwad News : सरकारवर केलेल्या टीकेचे स्वागतच, पण… – प्रकाश जावडेकर

एमपीसी न्यूज – केंद्रीय पर्यावरण, माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मीडियाने निष्पक्ष राहून वार्तांकन केले पाहिजे असा सल्ला दिला. मी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारा आहे. सरकाराला दिलेले सल्ले स्वागतार्ह आहेत, तसेच सरकार वरील टीकेचे देखील स्वागत आहे पण, हे करत असताना लोकांपर्यंत चुकीची माहिती गेली नाही पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे. चुकिच्या माहितीमुळे गैरसमज निर्माण होतात आणि देशात अशांती पसरते, असे जावडेकर म्हणाले.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे 55 वे अधिवेशन आज (रविवारी, दि. 7) चिंचवड येथील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनाचे उद्घाटन जावडेकर यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. जावडेकर म्हणाले, मीडियाचे स्वातंत्र्य कायम आबाधित राहिले पाहिजे. देशात काहीजण चुकीची माहिती पसरवण्याचे काम करत आहेत. शेतकरी आंदोलनात ट्रॅक्टरचा अपघात होऊन मृत्यू झाल्याचे सर्वांनी पाहिले, तरिही काहींना त्या शेतक-याला पोलिसांनी गोळी मारल्याचे सांगितले. असे केल्याने आणखी गैरसमज वाढतात आणि देशात अशांतता पसरते असे ते म्हणाले.

सरकारवर टीकाही केली पाहिजे आम्ही त्याचे स्वागतच करतो असे त्यांनी नमूद केले. शेतकऱ्यांसाठी मोदी सरकार अनेक योजना राबवत आहे. त्यामध्ये पिक विमा, किसान सन्मान निधी यासारख्या योजना आहेत. या माध्यमातून लाखों शेतकऱ्यांना लोखो रुपये देण्यात आले आहेत. 70 हजार कोटी रुपयांची एक कर्जमाफी पेक्षा हे काम अधिक मोठे असल्याचे त्यांनी नमूद करत काँग्रेसवर टीका केली. गरिबांच्या उद्धारासाठी सरकार कटिबद्ध आहे. आत्मनिर्भर भारतच्या माध्यमातून देश बदलावाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे ते म्हणाले. देशाने कोरोनाच्या दोन लसी निर्माण केल्या आणि सरकारने त्याच्या वापराला परवानगी देत जगात सर्वाधिक लसीकरण भारतात झाल्याचे जावेडकर यांनी नमूद केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.