Chinchwad News: ‘माझ्या मेंदूत कोणीतरी विचार टाकतंय’ : आयटी अभियंत्याची पोलिसांकडे तक्रार

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या घरात घुसताना एक संशयित आढळला. त्याचा मेंदू कुणीतरी ऑपरेट करत असल्याचे त्याने तपासात सांगितले. या प्रकरणानंतर तसाच काहीसा प्रकार पिंपरी चिंचवड शहरात समोर आला आहे. एका आयटी अभियंता तरुणाने पिंपरी चिंचवड पोलिसांकडे तक्रार केली असून ‘माझ्या मेंदूत कोणीतरी विचार टाकत असल्याचे त्या अभियंत्याचे म्हणणे आहे.

मागील आठवड्यात देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या घरात घुसताना सुरक्षा रक्षकांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले. तो व्यक्ती बेंगलोर येथील असून तो अजित डोभाल यांच्या घरात जाण्याचा प्रयत्न करत होता. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने त्याच्याकडे चौकशी केली असता पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. त्याचा मेंदू तंत्रज्ञानाचा वापर करून कोणीतरी नियंत्रित करत असल्याचे समोर आले. याबाबत यंत्रणांकडून तपास केला जात आहे.

‘काही जण तंत्रज्ञानाचा वापर करून माझ्या मेंदूवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे विचित्र आवाज ऐकायला येतात. ते थेट माझ्या मेंदूशी संवाद साधून मेंदूला सूचना करून काहीतरी कृत्य करण्यास मला भाग पाडले जाते. तसेच विशिष्ट विचार माझ्या मेंदूवर रुजविण्याचा प्रयत्न केला जात आहे. यातून माझ्या भावना तसेच इतर सवयींवर नियंत्रण मिळविले जात आहे. माझ्या मेंदूत विचार टाकून स्वप्नरंजन केले जात आहे. मोठमोठी स्वप्न रंगविली जात असल्यासारखे वाटते. तसेच मी माझ्या डोळ्यांनी जे पाहतो, ते सर्व संबंधित व्यक्तींना देखील दिसते. हा प्रकार व्हिडिओ गेमसारखाच असून, यातून निगराणीचा प्रकार केला जात आहे. मी इतरांशी काय बोलतोय किंवा काय बोलावे यावर देखील ते नियंत्रण मिळवतात.

मी विचार न केलेले संगीत व गाणी देखील माझ्या मेंदूत भरविली जातात. कोणीतरी सॅटेलाईट किंवा इतर तंत्रज्ञानाचा वापर करून लहरींव्दारे मानवी मेंदूवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयोग करीत आहे. त्यासाठी माझा वापर केला आहे’, असे संबंधित तरुणाकडून पोलिसांना सांगण्यात आले आहे.

असे प्रकार धोकादायक आहेत. याचा राष्ट्रीय सुरक्षेला धोका आहे. आपला कोणताही डेटा प्रायव्हेट राहणार नाही. असं तंत्रज्ञानाच्या माध्यमातून होऊ शकतं अशी माझी माहिती आहे. हा प्रकार सॅटेलाईटच्या माध्यमातून होत असून ‘आम्ही हे सॅटेलाईटने करतोय’ असे मला सांगितले जात होते. मेंदूवर इलेक्ट्रिक सिग्नलद्वारे नियंत्रण ठेवले जात आहे, असे संबंधित व्यक्तीने एमपीसी न्यूजशी बोलताना सांगितले.

त्यांनी याबाबत विदेश मंत्रालयाला पत्र देखील लिहिले आहे. मात्र हा विषय आपल्या अखत्यारीत येत नसून सुरक्षा मंत्रालय अथवा गृहमंत्रालयाला लिहिण्यास त्यांना सांगण्यात आले आहे. केंद्र आणि राज्य सरकारने अशा प्रकरणांची नोंद घ्यायला हवी. भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर संयुक्त राष्ट्रात हा विषय मांडावा. त्यानंतर जागतिक स्तरावर याबाबत प्रयत्न केले जातील. अशा प्रकारचा अनुभव ज्यांना येत आहे, त्यांनी पोलिसांकडे येऊन तक्रार करावी, असे आवाहन देखील संबंधित व्यक्तीने केले आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर म्हणाले, “अशा प्रकारे कोणीही निगराणी ठेऊ शकत नाही. नागरिकांनी बिनधास्त राहावे. तज्ज्ञांचा सल्ला आणि उपचार घ्यावा.”
मानसोपचारतज्ज्ञ डॉ. राजीव नगरकर म्हणाले, “आपल्यावर कोणीतरी पाळत ठेवतंय. त्याच्या म्हणण्याप्रमाणे अपल्याकडून काम करून घेतलं जातं आहे, असं वाटणे हे मनोविकाराचे लक्षण असू शकते. योग्य त्या तपासण्या करून घेणं आवश्यक आहे. त्यानंतर त्यावर उपचार करता येतील. मनावर व मेंदूवर ताण असेल तर असे भास होण्याची शक्यता आहे. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.”

पुणे शहरातही काहींना जाणवली ही समस्या

पुणे शहरात देखील काही नागरिकांना ही समस्या जाणवली आहे. त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यातील एक दोघांशी वाकड येथील आयटी अभियंत्याचे बोलणे झाले आहे. देशभरातील सुमारे 400 जणांवर हा प्रयोग केला जात असल्याचे म्हटले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.