Chinchwad news: …असे आहेत पिंपरी-चिंचवडचे नवे आयुक्त ‘आयर्नमॅन’ कृष्ण प्रकाश!

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्या जागी भारतीय पोलीस सेवेतील 1998 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी कृष्ण प्रकाश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कृष्ण प्रकाश यांना आयर्नमॅन म्हणूनही ओळखले जाते. ते सध्या महाराष्ट्र राज्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून मुंबई येथे कार्यरत आहेत.

पिंपरी चिंचवडचे नवीन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश ज्यांना के पी आयर्नमॅन म्हणून ओळखले जाते. ते झारखंड मधील हजारीबाग येथील आहेत. 1998 च्या बॅचचे आयपीएस कॅडेट आहेत. सायकलिंग, स्विमिंग, रनिंग यासाठी प्रसिद्ध असलेल्या कृष्ण प्रकाश यांच्या नावावर अनेक रेकॉर्ड आहेत.

‘रेस्ट ॲक्रॉस वेस्ट अमेरिका’ या स्पर्धेत त्यांनी सहभाग घेतला. 1 हजार 500 किलोमीटर अंतर सायकलिंगची स्पर्धा असून हिचा मार्ग पश्चिम अमेरिकेच्या चार राज्यातून जाणारा असतो. या मार्गावर काही ठिकाणी अति उष्ण तर काही ठिकाणी अतिशय थंड प्रदेश लागतो. या स्पर्धेसाठी 92 तासांचा वेळ असतो. कृष्ण प्रकाश यांनी ही स्पर्धा 88 तासात पूर्ण करून स्पर्धेत यश मिळवले. तसेच सायकलिंगमध्येही नवीन रेकॉर्ड बनवला.

ऑगस्ट 2017 मध्ये फ्रांस मध्ये ‘आयर्नमॅन ट्रायलथॉन’ ही स्पर्धा झाली. 3.86 किलोमीटर पोहणे, 42 किलोमीटर धावणे आणि 180 किलोमीटर सायकल चालवणे असे या स्पर्धेचे स्वरूप असते. कृष्ण प्रकाश यांनी ही स्पर्धा देखील 14 तास 8 मिनिटात पूर्ण करून वयाच्या 42 व्या वर्षी आयर्नमॅनचा किताब मिळवला आहे.

सतत हसतमुख आणि आपल्या अनोख्या कार्यशैलीमुळे प्रसिद्ध असलेले कृष्ण प्रकाश पिंपरी चिंचवड शहरात आले आहेत. शहरातील गुन्हेगारी रोखण्यात तसेच शहरात पोलिसांचा वचक निर्माण करण्यास ते यशस्वी होतात का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.