Chinchwad News: सराईत वाहनचोर ‘बुलेटराजा’मुळे त्याला पकडणारे पोलीस पथकही कोरोना पॉझिटिव्ह

एमपीसी न्यूज – सराईत वाहनचोर ‘बुलेटराजा’ला पकडणा-या पोलीस पथकाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बुलेटराजाला कोरोनाची लागण झाल्याने त्याला पकडणाऱ्या पोलीस पथकाची चाचणी करण्यात आली, त्यात संपूर्ण पथक पॉझिटिव्ह आले आहे.

दोन अधिकारी आणि सहा कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी मागील आठवड्यात सराईत वाहनचोर बुलेटराजाला अटक केली. त्याच्याकडून 10 बुलेट आणि 4 अन्य महागड्या दुचाकी जप्त करण्यात आल्या. त्याने चोरलेल्या दुचाकी जप्त करण्यासाठी गुन्हे शाखेचे पोलीस त्याला घेऊन अनेक ठिकाणी फिरले.

सुरुवातीला बुलेटराजाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्याला कोरोनाची कोणतीही लक्षणे नव्हती. काही कालावधीनंतर त्याला कोरोनाची लक्षणे जाणवू लागली. त्यामुळे त्याची कोरोना चाचणी केली असता त्याला कोरोनाची बाधा झाल्याचे उघड झाले.

बुलेटराजा कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्याला घेऊन राज्यातील विविध जिल्ह्यात फिरलेले पोलीस पथक धास्तावले. संपूर्ण पथकाची कोरोना चाचणी केली असता त्या संपूर्ण पथकाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.

गुन्हे शाखा, पोलीस ठाण्यातील डिटेक्शन ब्रांच आणि अन्य पोलिसांचा गुन्हेगार आणि नागरिकांशी थेट संबंध येतो. त्यामुळे पोलिसांना कोरोनाचा मोठ्या प्रमाणात धोका संभवतो आहे. शहरातील विविध गुन्हे शाखेतील अनेक पोलिसांना, त्यांच्या कुटुंबियांना कोरोना झाला आहे. काहीजण त्यातून बरे झाले आहेत. तर काहींवर उपचार सुरू आहेत.

गुन्हे शाखेतील संपूर्ण पथकाला कोरोना झाल्याने शहर पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.