Chinchwad News: वाढत्या वाहनचोरीच्या घटनांना पोलीस आळा घालतील?

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरात वाहनांच्या चोरीचे प्रमाण वाढत आहे. महिन्याला शेकडो वाहने चोरीला जात आहेत. या वाढत्या वाहन चोरीवर पोलिसांना नियंत्रण मिळवता येईल का, वाहनचोरांमध्ये पोलिसांचा धाक निर्माण होईल का, असे अनेक प्रश्न शहरवासीयांच्या मनात आहेत.

कोरोनाच्या काळात कठोर टाळेबंदी सुरू असताना देखील शहरातून वाहने चोरीला गेलेली आहेत. कठोर टाळेबंदीच्या काळात शहरातील रस्त्यांवर, सार्वजनिक ठिकाणी केवळ पोलीस, पोलीस आणि पोलिसच होते. असे असताना पोलिसांच्या नजरा चुकवून हे वाहन चोरटे वाहनांची चोरी करीत होते.

त्यातच पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलात सुरुवातीपासून मनुष्यबळाची अडचण आहे. सुरुवातीपासून या एकाच कारणावर सगळे मुद्दे रेटून नेले जात आहेत. वाढती गुन्हेगारी, वाढती वाहन चोरी आणि अन्य चोरीच्या गुन्ह्यांबाबत विचारणा केल्यास मनुष्यबळ कमी असल्याची उत्तरे आयुक्तालयाच्या स्थापनेपासून मिळत आहेत.

शहराचे पहिले पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी वेगवेगळ्या पथकांची निर्मिती केली. गुन्हे शाखांचा विस्तार करून पाच गुन्हेशाखा निर्माण केल्या. मात्र दुसरे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी कोरोनाच्या काळात मनुष्यबळाची अडचण पुढे करत वाहन चोरी विरोधी पथक, अँटी गुंडा स्कॉड यांसारखी काही पथके बरखास्त केली.

या पाठकांमध्ये काम करणाऱ्या पोलिसांना थेट रस्त्यावर उतरवून तसेच पोलीस ठाण्यात काम देण्यात आले. दरम्यान पोलिसांचा वाहन चोरांवरील पकड सैल झाली. याचाच गैरफायदा घेत चोरट्यांनी पुन्हा वाहन चोरीचा सपाटा लावला. दररोज शहरातून सरासरी तीन वाहने चोरीला जात आहेत. वाहन चोरी विरोधी पथक बरखास्त केल्याचा परिणाम समोर येत असल्याचे बोलले जात आहे.

वाहन चोरी पथक आणि अन्य काही पथके पुन्हा एकदा सुरू करणे गरजेचे असल्याचे शहरवासियांमधून बोलले जात आहे. वाढत्या वाहन चोरीच्या घटनांना पिंपरी चिंचवड पोलीस आळा घालतील का? असा प्रश्न देखील नागरिक उपस्थित करीत आहेत.

वाहनचोरी प्रतिबंधक पथक पुन्हा सुरू करण्याचा विचार – कृष्ण प्रकाश

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले, “वाहन चोरीच्या गुन्ह्यांच्या मुळाशी जाऊन तपास करणे गरजेचे आहे. त्यासाठी वाहन चोरी प्रतिबंधक पथक सुरु करण्याचा विचार आहे.”

वाहन चोरी प्रतिबंधक पथकाचे तत्कालीन पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे म्हणाले, “कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाहन चोरी विरोधी पथक बरखास्त करण्यात आले. पथकातील कर्मचारी-अधिका-यांना गुन्हे शाखेच्या कारवाया, पेट्रोलिंग आणि पोलीस ठाण्यातील वयस्कर, आजारी पोलिसांच्या जागी काम देण्यात आले. हे काम अजूनही सुरु आहे. त्यामुळे अद्याप हे पथक स्वतंत्रपणे काम करत नाही. वरिष्ठांच्या आदेशानुसार पथकाचे काम सुरु होईल.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.