Chinchwad News : एम्पायर इस्टेट उड्डाणपूलाला जोडणाऱ्या जिन्यांचे काम रखडले ; जीव धोक्यात टाकून नागरिकांकडून जिन्याचा वापर

जिना अर्धवट अवस्थेत; रंगतात दारू, जुगाराच्या पार्ट्या

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसीन्यूज : काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता चिखली या बीआरटी मार्गावरील एम्पायर इस्टेट सोसायटीजवळ संत मदर तेरेसा उड्डाणपूल उभारला आहे. त्यावरून चिंचवडमधील लिंक रस्त्यावर उतरणे व चढण्यासाठी जिना उभारण्यात आला. मात्र, काम अंतिम टप्प्यात असताना या जिन्याचे काम रखडले. मुख्य पुलाला जोडणारा हा जिना अर्धवट अवस्थेत असल्याने येथे दारू, जुगाराच्या पार्ट्या रंगू लागल्या आहेत. त्याचबरोबर नागरिक जीव धोक्यात घालून या जिन्याचा वापर करीत आहेत.

पवना नदी, पिंपरी-चिंचवड लिंक रस्ता, पुणे-मुंबई लोहमार्ग, महामार्ग यांना ओलांडून जाण्यासाठी काळेवाडी फाटा ते देहू आळंदी रस्ता या बीआरटी मार्गावर सुमारे सव्वा किलोमीटरचा उड्डाणपूल उभारला आहे. येथे पुलावर बीआरटी बस थांबा आहे.

काळेवाडीफाटा ते चिंचवड किंवा चिंचवड ते काळेवाडीफाटा येथे ये- जा करण्यासाठी पादचाऱ्यांसाठी चिंचवड स्टेशन व काळेवाडी फाटा येथील एम. एम. महाविद्यालयाजवळ असे एकूण चार जिने उभारण्यात आले आहेत.

या जिन्यांचे काम अर्धवट अवस्थेत असून, पालिका प्रशासनाने हे जिने कोणतीही सूचना न देता हे काम तसेच अर्धवट स्थितीत ठेवले आहे. त्यामुळे नागरिक जीव धोक्यात घालून येतुन ये-जा करतात. लहान मुले तर चक्क या जिन्यांचा वापर खेळण्यासाठी करत आहे. त्यामुळे अपघात किंवा दुखापतीची संभावना आहे.

कोरोना व लॉकडाऊनमुळे सर्वच विकासकामाची रखडपट्टी झाली आहे. निधीचा खडखडाट झाला आहे त्यामुळे या जिन्याचे काम देखील अडगळीत पडल्यास दिसून येत आहे. मात्र यामुळे जिन्याच्या कामाची दुरवस्था होत आहे. गेले चार महिने येथे पालिकेचा सुरक्षा रक्षक किंवा कर्मचारी फिरकलेले नाही असे येथील स्थानिक रहिवाशांनी सांगितले.

जीव धोक्यात टाकून जिन्याचा वापर- अगरवाल

याबाबत एम्पायर इस्टेट फेडरेशनचे संचालक राजेश अगरवाल म्हणाले, एम्पायर इस्टेटमधून जाणाऱ्या संत मदर टेरिसा उड्डाणपुलाला लागून असलेला पादचारी मार्गाला जोडणारा जिना कधी सुरू होणार यासाठी वारंवार पाठपुरावा केला. मात्र, प्रशासनाकडून उत्तर मिळत नाही. एम्पायर इस्टेट उड्डाणपूल सुरु होऊन दोन वर्षा पूर्ण झाले तरीही त्या वरील उड्डाणपुलाला जोडणारे जीने अजून सुरू नाही. हे जीने अतीशय निकृष्ट दर्जाचे व धोकादायक आहेत. जिने बांधून झाले पण ते उड्डाणपुलाला जोडले नाही. त्यामुळे लोक जीव धोक्यात टाकून जिन्याचा वापर करून उड्डाणपुलावर जातात. याशिवाय या जिन्याचा वापर आता बेकायदा कामांसाठी केला जात आहे .

 

काम अपूर्ण ठेवल्याबद्दल नोटीस – भोजने

जिन्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र हे काम करणाऱ्या ‘गँलन इंडिया’ या ठेकेदाराकडून दिरंगाई झाल्याने काम रखडले आहे. याबाबत ठेकेदाराला नोटीस बजाविण्यात आली आहे. जिन्याचे काम ठप्प असल्याबाबत चार ते पाच बैठका देखील झाल्या आहेत मात्र काम पूर्ण करण्यात आले नाही. त्यामुळे अंतिम कामासाठी नव्याने निविदा काढण्यात येणार आहे. शिवाय ‘गँलन इंडिया’ची अनामत रक्कम देखील जप्त करण्यात येणार आहे. विजय भोजने – बीआरटी प्रकल्प प्रवक्ता (स्थापत्य )

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.