Chinchwad News: गॅस दरवाढीच्या निषेधार्थ युवक काँग्रेसचे फलक आंदोलन

एमपीसी न्यूज – केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल सोबतच घरगुती गॅसच्या किमतीत मोठी वाढ केली आहे. या भरमसाठ दरवाढीला विरोध करत पिंपरी- चिंचवड युवक काँग्रेसच्या वतीने आज (मंगळवारी) अनोखे फलक आंदोलन करण्यात आले.

चिंचवड चौकातील पेट्रोल पंपालगतच मोदी यांचा फलकाद्वारे उपाहासात्मक निषेध करण्यात आला. युवक काँग्रेसकडून उभारण्यात आलेल्या या फ्लेक्सवर महागाईच्या या भयानक सद्यपरिस्थितीवर मोदी यांचे मौन, डोळेझाक व दुर्लक्ष याची तुलना करुन निषेध नोंदविण्यात आला.

याबाबत माहीती देताना युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे म्हणाले, देश कोरोनाच्या संकटातून सावरतोय. तोच लगेच भाजपाच्या मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढ करत देशातील जनतेला नव्या संकटात टाकले आहे.

पेट्रोल, डिझेलच्या दराने जवळपास शंभरी गाठल्याने सर्वसामान्यांना आधीच फटका बसला. त्यात आता एलपीजी सिलेंडर दरात सोमवारी 25 रूपयांनी वाढ करण्यात आली. आता 14.2 किलोचा गॅस सिलेंडरचा दर प्रति सिलेंडर 125 रूपयांनी वाढला आहे. आज सिलेंडर 819 रुपये झाला आहे.

यापूर्वी 4 फेब्रुवारी रोजी 25 रूपये, 15 फेब्रुवारी रोजी 50 रूपये, आणि 25 फेब्रुवारी रोजी 25 रूपये अशी जवळपास एका महिन्यातच केलेली ही चौथी दरवाढ आहे.

या नागरिकांच्या मुलभूत निकडीच्या व दैनंदिन गरजांबाबत बाबत पंतप्रधान मोदी यांचे वर्तन हे ‘कुछ मत देखो, कुछ मत बोलो व कुछ मत सुनो,’ असे झाले आहे. त्यांच्या या वर्तनाचा निषेध व त्यांचे हे रूप जनतेच्या समोर आणण्यासाठी हे फलक आंदोलन केले, असे बनसोडे यांनी सांगितले. यावेळी भाजपा विरोधात व मोदी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव अक्षय जैन, काँग्रेस सोशल मिडीया विभागाचे शहर अध्यक्ष आयुष मंगल, कष्टकरी कामगार पंचायतीचे प्रल्हाद कांबळे, युवक काँग्रेसचे शहर सरचिटणीस शंकर ढोरे, विरेंद्र गायकवाड, अनिल सोनकांबळे, मिलिंद बनसोडे, अलोक लाड, विशाल सरवदे, चिंचवड विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सौरभ शिंदे, पिंपरी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष हिराचंद जाधव, अर्णव कामठे, तेजस पाटील, ओंकार पवार, प्रवीण जाधव, पांडूरंग वीर, रोहीत सोनावले आदी पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.